मुंबई, दि. 4 : ‘ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतील, असा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवे, असा विचार मनात आला. त्यामुळेच 4482 चौ. मीटरमध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते-बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे’, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमात वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)  शोमिता विश्वास, महिम गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनरंक्षक कुशाग्र पाठक, जितेश मल्होत्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते