‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटात अयोग्य संवादांचे लिखाण केल्याच्या प्रकरणी लेखक मनोत मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी क्षमायाचना केली आहे. मुंतशीर यांच्या लिखाणामुळे रामायणाचे विडंबन झाले होते आणि त्यामुळे कोट्यवधी हिंदूंना धार्मिक भावना दुखावल्या होत्या. मुंतशीर यांनी आरंभी श्री हमुमंतांच्या मुखी घातलेल्या वादग्रस्त संवादाचे ठामपणे समर्थन केले होते. आता त्यांना उपरती होऊन त्यांनी क्षमायाचना केली आहे.

मुंतशीर यांनी ८ जुलै या दिवशी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, हे मी मान्य करतो. माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषि-मुनी आणि श्रीराम भक्त यांची मी हात जोडून विनाअट क्षमा मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आपल्या सर्वांना एक आणि अतूट रहाण्याची आणि आपल्या पवित्र शाश्‍वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो.’

मुंतशीर संधीसाधू आहेत ! – जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया

मनोज मुंतशीर यांनी क्षमा मागितल्याचे ट्वीट प्रसारित झाल्यानंतर अनेक ट्विटर  वापरकर्त्यांनी मुंतशीर यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. एकाने म्हटले, ‘संवाद लिहिण्यापूर्वी विचार करायला हवा होता’, तर अन्य एकाने ‘तुम्ही संधीसाधू आहात’, अशा शब्दांत मुंतशीर यांना सुनावले.