आषाढी एकादशी पालखी मार्गात भाविकांना स्‍वच्‍छता आणि सुविधा यांसाठी २१ कोटी रुपये संमत ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

8

मुंबई – आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्‍ह्यांतून मार्गक्रमण करणार्‍या विविध संतांच्‍या पालख्‍यांसमवेत असणार्‍या भाविकांना स्‍वच्‍छता आणि सुविधा यांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये निधी संमत करण्‍यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

गिरीश महाजन म्‍हणाले, ‘‘आषाढी एकादशीच्‍या निमित्ताने लाखो वारकरी प्रतिवर्षी पायी चालत पंढरपूरला जातात. यामध्‍ये विविध दिंड्यांचाही सहभाग असतो. पालखी सोहळ्‍यात अनेक ठिकाणी मुक्‍काम केला जातो. या ठिकाणी वारकर्‍यांना शासनाच्‍या वतीने सोयीसुविधा मिळाव्‍यात, यासाठी या निधीचे प्रावधान करण्‍यात आले आहे. मुक्‍कामाच्‍या ठिकाणी तात्‍पुरत्‍या शौचालयांची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. पालखी सोहळ्‍यातील संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका महाराज या प्रमुख पालख्‍यांचा प्रवास जवळपास २२ दिवसांहून अधिक दिवसांचा असतो. वारकर्‍यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भाविकांसाठी तात्‍पुरते शौचालय, निवारा आणि इतर सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी पुणे जिल्‍हा परिषदेला १७ कोटी ६४ लाख रुपये निधी संमत करण्‍यात आला आहे.’’

सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्‍ह्यांतील पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी देण्‍यात आला आहे. यामध्‍ये वारी ज्‍या ग्रामपंचायतीच्‍या सीमेमधून जाणार आहे, त्‍या ग्रामपंचायतीतील स्‍वच्‍छता राखणे आणि भाविकांना सुविधा पुरवण्‍याचे दायित्‍व ग्रामपंचातींवर असणार आहे, असे या वेळी गिरीश महाजन यांनी म्‍हटले.