‘भारत, चीन आणि रशिया येथील हवा घाणेरडी !’ – ट्रम्प.

95

भारतातील हवा अशुद्ध आहे’, याचा अर्थ ‘अमेरिकेतील हवा शुद्ध आहे’, असा होत नाही, हे ट्रम्प यांनी लक्षात घ्यायला हवे !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत गेल्या ३५ वर्षांत सर्वांत अल्प प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होत आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वांत स्वच्छ आहे आणि कार्बनचे उत्सर्जन सर्वांत अल्प आहे. चीन, रशिया आणि भारत यांच्याकडे पहा, तेथे किती घाणेरडी हवा आहे. हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये चालू असलेल्या अध्यक्षीय वादविवादात ट्रम्प यांनी ही टीका केली. या वादविवादात पर्यावरण पालट आणि कार्बन उत्सर्जन या सूत्रांवरील स्वतःच्या धोरणांचा बचाव करण्यासाठी ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशिया यांच्यावर आरोप केले.

ट्रम्प यांनी पर्यावरण विषयीच्या ‘पॅरिस करारा’तून बाहेर पडण्याचे या वेळी समर्थन केले. ‘पॅरिस करार हा एकतर्फी होता. या करारामुळे अमेरिकेची हानी झाली असती’, असे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांचे विधान दुर्दैवी ! – शिवसेना

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताविषयीचे विधान दुर्दैवी आहे. हवामान पालटाच्या विरोधातील लढाईसाठी भारत कटीबद्ध आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केली.

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात.