लक्ष्मी विलास बँक ‘या’ बँकेत विलीन करणार

82

मुंबई : रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं असून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकर बँकेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेला डीबीएस बँक इंडिया या कंपनीत विलीन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

मूळचा सिंगापूरचा समूह असलेल्या डीबीएसने यासाठी २५०० कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकारणामुळे डीबीएस समुहाला भारतात बँकिंग परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव तयार केला असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. पुढील महिनाभरात या योजनेची अमलबजावणी केली जाईल, असे आरबीआयने म्हटलं आहे. खातेदारांच्या हिताच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेकडून लक्ष्मी विलास बँकेच्या सक्षमीकरणाचा विचार केला जात आहे. आजच्या कारवाईने खातेदारांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं आहे. बँकेच्या बुडीत कर्ज मोठी वाढ झाली आहे. बॅंकेची व्यावसायिक रणनीती सपशेल अपयशी ठरल्याने रिझर्व्ह बँकेला आज कारवाई करावी लागली आहे. येत्या १६ डिसेंबरपर्यंत खातेदारांना केवळ २५ हजार रुपये काढता येणार आहेत.