महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या नव्या संकेतस्थळाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

52

राज्यात पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीचं नवं संकेतस्थळ, सिंहगड इथलं नुतनीकरण झालेलं पर्यटक निवास आणि गणपतीपुळे इथल्या बोट क्लबचा एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांच्या काळातही पर्यटनस्थळांशी संबंधित पायाभुत सुविधा तसंच सेवांची वाढ आणि विकाससाठी पर्यटन विभाग करत असलेल्या प्रयत्नांचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं. जगभरातल्या कोणत्याही पर्यटकानं नोंदणीसाठी एमटीडीसी निर्मिती पर्यटक निवासाला प्राधान्य द्यायला हवं अशा रितीनं चांगल्या दर्जाच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात, राज्यातलं पर्यटन वैभव जगभरासमोर खुलं करण्यासाठी पर्यटन विभागाला सर्वतोपरी प्रोत्साहन दिलं जाईल असं ते म्हणाले.

मेक माय ट्रीप आणि गो आय बीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर,  सामंजस्य करार झाला. स्थानिक तसंच परदेशी ग्राहकांसाठी एमटीडीच्या निवासांच्या नोंदणीशी संबंधित हा करार आहे. याशिवाय स्काय डायव्हींग या साहसी क्रीडा प्रकारासंदर्भात स्काय-हाय या कंपनीसोबत तर एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सोबतही सामंजस्य करार केला गेला. पर्यटन विकासावर राज्य शासनानं विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे, लोकांनाही पर्यटन साक्षर करणं गरजेचं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.