INDIA Anti BJP

बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपविरोधी पक्षांची बैठक १८ जुलै या दिवशी येथे पार पडली. या बैठकीला २६ राजकीय पक्षांचे प्रमुख, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उद्धव ठाकरे आदींचा समावेश होता. या वेळी त्यांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लूझिव्ह अलायन्स) (INDIA) असे नाव ठेवल्याचे घोषित केले. या आघाडीची पुढील बैठक मुंबईमध्ये असणार आहे. पहिली बैठक २३ जून या दिवशी बिहारची राजधानी पाटलीपुत्र येथे झाली होती. भाजपकडूनही १८ जुलै या दिवशी त्याच्या मित्रपक्षांची बैठक देहलीमध्ये आयोजित करण्यात आली होती.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बैठकीत म्हणाले की, आमची २६ पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एन्डीए’ची (राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीची)  बैठक बोलावली आहे. यात त्यांनी ३० पक्षांना बोलावले आहे. हे ३० पक्ष कुठले आहेत, तेच ठाऊक नाही. हे पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत कि नाही तेसुद्धा कुणाला ठाऊक नाही. या पक्षांची नावेही कधी ऐकली नाहीत. ज्यांच्याशी मोदी याआधी कधी बोलत नव्हते त्यांनाही बैठकीसाठी बोलावले आहे. मोदी आता प्रत्येक पक्षाशी संपर्क साधत आहेत. त्या पक्षाच्या अध्यक्षांशी बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष वेगवेगळ्या राज्यात जाऊन तिथल्या स्थानिक पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत; कारण ते (नरेंद्र मोदी) आता विरोधकांना घाबरले आहेत.