चेन्नई (तमिळनाडू) – संदेश बनवतांना किंवा पुढे प्रसारित करतांना प्रत्येकाने सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे. संदेश प्रसारित करतांना किंवा पुढे पाठवलेला (फॉरवर्ड केलेला) संदेश हा कायमचा पुरावा बनतो. यामुळे होणारी हानी भरून काढणे जवळजवळ अशक्य आहे. संदेश पुढे पाठवण्याचा अर्थ त्यातील मजकुराला मान्यता देणे, असा आहे. जर त्यात अपमानास्पद मजकूर असेल, तर फॅारवर्ड करणार्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एप्रिल २०१८ मध्ये भाजपचे नेते एस.व्ही. शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी फॉरवर्ड केली होती. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आल्याने शेखर यांनी गुन्हा रहित करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. शेखर यांनी दावा होता की, त्यांनी आलेला संदेश न वाचता केवळ फॉरवर्ड केला होता. त्याच दिवशी हा संदेश काढून टाकत क्षमाही मागितली होती. न्यायालयाने मात्र ही याचिका फेटाळत ‘क्षमा मागितल्यामुळे तुम्ही केलेला गुन्हा अल्प होत नाही. प्रत्येकाने सामाजिक दायित्वाचे पालन केले पाहिजे’, अशा शब्दांत त्यांना फटकारले.