News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिककरांसाठी देशभक्तीचा, अभिमानाचा आणि थराराचा अनुभव देणारा भारतीय हवाई दलाचा जागतिक कीर्तीचा ‘सूर्यकिरण एअर शो’ नाशिकमध्ये प्रथमच आयोजित करण्यात येणार आहे. हा भव्य हवाई सोहळा २२ आणि २३ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत गंगापूर धरण परिसरात पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘नाशिक जिल्हा विकास आराखडा’ आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पर्यटन, सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवाला राष्ट्रीय व जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या एअर शोचे आयोजन नाशिक जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय हवाई दल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाची प्रसिद्ध ‘सूर्यकिरण एरोबॅटिक टीम’ आपल्या लढाऊ प्रशिक्षण विमानांच्या सहाय्याने आकाशात नेत्रदीपक आणि थरारक कसरती सादर करणार आहे. विविध अॅरोबॅटिक फॉर्मेशन्स, समन्वयात्मक उड्डाणे आणि अत्यंत अचूक नियंत्रणासह सादर होणारी हवाई प्रात्यक्षिके नागरिकांना थक्क करणारी ठरणार आहेत.

नाशिकच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाचा भव्य हवाई शो आयोजित होत असून, यामधून नागरिकांना भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य, शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि आधुनिक संरक्षण क्षमता प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या अवघ्या तीन दिवस आधी होणारा हा कार्यक्रम नाशिककरांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी ३० ते ४० हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून, संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन सेवा आणि प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सुरक्षितता आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने एअर शोसाठी प्रवेश शुल्क लागू करण्यात आले असून, विविध श्रेणीतील तिकिटे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध असणार आहेत. नागरिकांनी वेळेत तिकिटे घेऊन नियोजित वेळेत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हा एअर शो नाशिकच्या पर्यटनाला चालना देणारा आणि शहराच्या प्रतिमेला राष्ट्रीय पातळीवर उंचावणारा ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.