राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या राज्य कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूमुळे होणारा मृत्यूदर कमी करणं आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.

सध्या रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार असून, फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.