why-is-vat-purnima-vrat-observed

वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व खालील लेखातून समजून घेऊया.

भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला. वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.

वटपौर्णिमा हे व्रत करण्याची पद्धत

प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात. स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा.

यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करणे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद

वडाच्या मूळ खोडामध्ये अधिक प्रमाणात शिवतत्त्व सामावलेले असल्याने प्रत्यक्ष झाडाची भावपूर्णरित्या पूजा करून ३० प्रतिशत, तर केवळ फांदीच्या पूजेने २ – ३ प्रतिशत एवढ्याच प्रमाणात लाभ मिळण्यास साहाय्य होते. मूळ, खोडविरहित झाडाची फांदी ही झाडाच्या मूळ चेतनेपासून विलग झाल्याने तिच्यामध्ये अचेतनत्व अधिक प्रमाणात असल्याने तिची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असते. फांदीतील अचेनत्वाचा परिणाम म्हणून तिची चैतन्य वहन करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असल्याने घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने फारसा लाभ मिळत नाही. ज्या ठिकाणी नैसर्गिकता अधिक असते, त्या ठिकाणी चेतनेचे प्रमाणही अधिक असल्याने चैतन्याच्या फलप्राप्तीचे प्रमाणही अधिक असते.

पतीव्रता सावित्रीच्या कथेतून बोध घ्या आणि तिच्यासारखी साधना अन् धर्माचरण करा 

‘पती-पत्नीतील स्नेहसंबंध दृढ करून जिवांना आत्मज्ञान प्राप्त करून देणे’, हाच वटपौर्णिमा व्रताचा उद्देश आहे. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाची तीन दिवस उपासना केली अन् त्यानंतर यमदेवालाही भक्तीने संतुष्ट करून पतीचे प्राण परत मिळवले. सावित्रीची ही कथा महाभारताच्या वनपर्वात येते. अज्ञातवासाच्या काळात पांडवांना मार्कंडेय ऋषींनी ती पांडवांना ऐकवली.

सत्यवानाची जीवनयात्रा समाप्त झाल्यानंतर त्याचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमदूत त्याच्यासमोर उपस्थित झाले; मात्र त्या वेळी सत्यवानाचा देह सावित्रीच्या मांडीवर होता. तिच्या पातिव्रत्याच्या तेजासमोर यमदूतांना उभे रहाणेही कठीण झाले. त्यामुळे साक्षात यमदेवच त्याचे प्राणहरण करण्यासाठी गेला. त्याने आपल्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण शरिरातून काढून घेतले.

यमदेव सत्यवानाचा प्राण घेऊन निघाल्याचे बघून सावित्री त्याच्या मागे चालू लागली. सावित्रीला बघून यमदेव म्हणाला, ‘‘सावित्री, तुझी जीवनरेखा अजून संपलेली नाही. त्यामुळे तुला माझ्या मागून येता येणार नाही. तू परत जा.’’ तेव्हा सावित्री म्हणाली, ‘‘हे भगवन्, मी तुमच्या पाठीमागून येत नाही. मी माझ्या पतीच्या मागून चालत आहे.’’ यावर यमदेव म्हणाला, ‘‘तुझा पती वनामध्ये मृत्यू येऊन पडला आहे. तेव्हा त्याचे मरणोत्तर क्रियाकर्म करून त्याच्या आत्म्याला गती दे. धर्मशास्त्रानुसार ते तुझे कर्तव्य आहे.’’

यमदेवाच्या या विधानावर सावित्री म्हणते, ‘‘हे भगवन्, जे वनामध्ये मृत होऊन पडले आहे, ते शरीर म्हणजे माझा पती नाही. ते माझ्या पतीचे शरीर आहे. ते शरीर पंचमहाभूतांनी निर्माण केले आहे. त्यात माझा पती रहात होता. माझ्या पतीला तर तुम्ही घेऊन निघाला आहात. धर्मशास्त्र सांगते, ‘पत्नीने नेहमी पतीच्या मागून जावे.’ तेच धर्माचरण मी करत आहे आणि धर्माचरण करण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही.’’ सावित्रीचे हे उत्तर म्हणजे आत्मनात्मविवेकाचे उत्तम उदाहरण आहे. यमदेव हा स्वतः धर्मराज आहे. साहजिकच तो धर्माचरणापासून कुणाला रोखू शकत नाही. अशा प्रकारे धर्मसंकटात सापडलेल्या यमदेवाने सावित्रीला म्हटले, ‘‘तुझ्या या उत्तराने मी प्रसन्न झालो आहे; पण मला माझे कर्तव्य सोडता येणार नाही. त्यामुळे पतीला जिवंत करण्याच्या बदल्यात तू एक वर माग.’’ यावर सावित्री म्हणाली, ‘‘हे भगवन्, माझे सासू-सासरे नेत्रहीन आहेत. त्यांना नेत्र प्रदान करा.’’

सावित्रीचे बोलणे ऐकून यमदेवाला आश्‍चर्य वाटले. तो म्हणाला, ‘‘आताच तू नश्‍वर शरिरावर भाष्य केलेस. मग वर मागण्यास सांगितल्यावर तू त्याच शरिराच्या नश्‍वर नेत्रांचा वर कसा मागितलास ?’’ सावित्री म्हणते, ‘‘हे देवा, ‘मनुष्य नेत्रहीन असला, तरी तो आंधळा असत नाही’, हे सत्य आहे. त्याला ज्ञानाची दृष्टी असते; पण जोपर्यंत जीवन आहे अन् दृष्टीगोचर जगात कर्मे करायची असतात, तर उत्तम धर्माचरण करण्यासाठी शरीर सुदृढ असायला हवे. सूक्ष्म ज्ञानेंद्रियांच्या समवेत स्थूल ज्ञानेंद्रियेही सक्षम असायला हवीत.’’ यमदेव या उत्तराने प्रसन्न झाला. त्याने सासू-सासर्‍यांना नेत्र प्रदान करून सावित्रीला परत जायला सांगितले, तरीही सावित्री पुन्हा यमदेवाच्या मागून चालू लागली.

सावित्रीला पुन्हा पाठीमागून येतांना बघून यमदेवाने तिला येण्याचे कारण विचारले. तेव्हा सावित्री म्हणाली, ‘‘हे भगवन्, धर्मशास्त्र सांगते, ‘संतांची कृपा, सत्संग आणि देवदर्शन अत्यंत भाग्यवंताला लाभते. ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने सर्वस्वाचा त्याग करून त्यांच्या चरणी रहावे. मग मी तुमचा सत्संग कसा सोडू ? मला धर्माचरण करण्यापासून रोखू नका.’’ या उत्तराने धर्मसंकटात पडलेल्या यमदेवाने तिला आणखी एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने सासू-सासर्‍यांचे गेलेले राज्य परत मागितले. सावित्रीने सासर्‍यांचे राज्य परत मिळण्याचा वर मागितल्याने यमराज पुन्हा अचंबित झाला. त्याने विचारले, ‘‘सावित्री, तू आताच सर्वस्वाचा त्याग करून संतांची कृपा आणि देवतांचे दर्शन यांचे महत्त्व सांगितलेस. मग वर मागतांना राज्य का मागितलेस ?’’ यावर सावित्री म्हणते, ‘‘हे भगवन्, धर्मशास्त्र सांगते, ‘मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या समवेत इतरांकडूनही धर्माचरण करून घेतले पाहिजे. इतरांकडून धर्माचरण करून घेण्यासाठी राजधर्मासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. राजसत्ता हातात असेल, तर सर्वांना धर्माचरणी करणे सोपे होते.’ धर्म टिकवून ठेवण्यासाठीच मी हा वर मागितला.’’ यमराज प्रसन्न झाला आणि त्याने वर दिला.

सावित्री पुन्हा यमराजाच्या मागून चालू लागली. यावर यमराज म्हणाला, ‘‘तुला हवे ते वर दिले. आता तू माझ्या मागून का येतेस ?’’ यावर सावित्री म्हणते, ‘‘तुम्ही मला मोठ्या धर्मसंकटात टाकले आहे. ‘त्यातून मार्ग कसा काढावा ?’, ते मला समजत नाही. तुम्ही सत्यवानाचे प्राणहरण केल्याने वृद्धापकाळात मला सासू-सासर्‍यांची सेवा करावी लागेल. दुसर्‍या बाजूने माझ्या वडिलांना पुत्र नसल्याने त्यांच्याही राज्याचे दायित्व मला बघावे लागेल. मी अडचणीत सापडले आहे. मला तुमच्याविना कोण सोडवणार ?’’ सावित्रीची वाक्पटूता बघून यमदेवाने तिच्या वडिलांना पुत्र होण्याचा वर दिला अन् परत जाण्यास सांगितले, तरीही सावित्रीने यमदेवाचा पाठलाग चालूच ठेवला.

सावित्रीला पुन्हा पाठीमागून येतांना बघून आता मात्र यमदेव संतापला. तो म्हणाला, ‘‘सावित्री, मी तुला जे पाहिजे ते सर्व दिले. यापुढे तू येऊ नकोस. हवा तर तू आणखी एक वर माग; पण तू मागे येऊ नकोस.’’ यावर सावित्री म्हणते, ‘‘भगवन्, धर्मशास्त्र सांगते, ‘देवतांच्या दर्शनानेच माणसाचे कष्ट दूर होतात’; मात्र माझे कष्ट अजून दूर झालेले नाहीत. मी आपल्याला शरण आले आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि आमचे धर्माचे राज्य आमच्यानंतरही अबाधित रहाण्यासाठी शंभर पुत्रांचे वरदान द्या.’’ आता धर्मराज्य अबाधित ठेवण्यासाठी वर मागणार्‍या सावित्रीवर यमराज प्रसन्न झाला आणि त्याने तिला शंभर पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला. साहजिकच त्यासाठी सत्यवानाला जीवदान देणे यमराजाला भाग पडले.

शेवटी यमदेवाने सावित्रीला विचारले, ‘‘सत्यवानाचे आयुष्य अवघे १ वर्ष उरल्याची कल्पना नारदमुनींनी तुला दिली होती. तू राजकन्या होतीस. तुला सत्यवानापेक्षा सुंदर आणि पराक्रमी राजकुमार भेटला असता, तरीही तू पती म्हणून सत्यवानालाच का निवडलेस ?’’ यावर सावित्रीने उत्तर दिले, ‘‘जेव्हा मी वनात सर्वप्रथम सत्यवानाला बघितले, तेव्हा तो आपल्या अंध माता-पित्याची अतिशय मनापासून सेवा करत होता. ‘खडतर परिस्थितीतही शांत राहून आनंदाने जो माता-पित्यांची सेवा करतो, त्याच्यात निश्‍चितच दिव्य आत्मा वास करत असणार’, असे मला वाटले. निव्वळ शारीरिक सौंदर्य आणि पराक्रम मनाला आनंद अन् शांती यांची अनुभूती देऊ शकत नाही; म्हणूनच तेजस्वी आत्मा असलेल्या सत्यवानाला मी पती मानले.’’ ‘वटपौर्णिमा या व्रतातून धर्माचरण करण्याची बुद्धी सर्व सुवासिनींना प्राप्त होवो अन् सर्व स्त्रिया धर्माचरणी होवोत’, हीच श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’

(कथा आणि माहिती संदर्भ – सनातन संस्था)