जगातील सर्व देशांनी आतंकवादाच्या विरोधात एकत्र येण्याची आवश्यकता ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

62

केवडिया (गुजरात) – गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक आतंकवादाच्या समर्थनासाठी उघडपणे पुढे येत आहेत, ही आज जागतिक चिंतेची गोष्ट बनली आहे. आजच्या वातावरणात जगातील सर्व देशांनी, सर्व देशांच्या सरकारांनी, सर्व धर्मांच्या लोकांनी आतंकवादाच्या विरोधात एकजूट होण्याची अधिक आवश्यकता आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ते येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त बोलत होते. त्यांनी फ्रान्समधील घटनेचा (महंमद पैगंबर याची व्यंगचित्रे दाखवणार्‍या शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर फ्रान्सने कट्टरतावाद्यांच्या विरोधात मोहीम उघडल्यामुळे एका धर्मांधांने चर्चमध्ये घुसून ३ जणांना ठार केल्याच्या घटनेचा) उल्लेख न करता त्यावर भाष्य केले.

मोदी म्हणाले की, शांती, बंधूभाव आणि परस्पर आदराची भावना हीच मानवतेची खरी ओळख आहे. आतंकवाद आणि हिंसा यांमुळे कधीही, कुणाचेही कल्याण होऊ शकत नाही. काही दिवसांत शेजारी देशातून ज्या बातम्या आल्या आहेत, तेथील संसदेत ज्या प्रकारे सत्य स्वीकारले गेले आहे, त्यावरून या लोकांचा खरा तोंडवळा सर्वांसमोर उघड झाला आहे.