मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने ‘मुंबई पोलीस हे जगातील उत्तम पोलीस दल आहे’, असे मत नोंदवले आहे. कोरोनाच्या प्रचंड तणावाच्या काळातील मुंबई पोलिसांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुकही न्यायालयाने केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सुनैना होले यांनी आक्षेपार्ह लिखाण सामाजिक प्रसारमाध्यमातून ‘पोस्ट’ केले होते. याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपिठाने वरील मत व्यक्त केले आहे. तसेच होले यांना पोलीस स्थानकात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने पुढे म्हटले की, मुंबई पोलिसांची गणना जगातील सर्वाधिक उत्तम पोलिसांमध्ये केली जाते. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. आधीच तणावाखाली असतांना मुंबई पोलिसांचे काम हे महामारीच्या कठीण काळात पुष्कळ अवघड झाले होते. पोलीस अधिकारी १२ घंट्यांहून अधिक काळ काम करायचे. त्यानंतर मोर्चे आणि सण यांच्यासाठी बंदोबस्तालाही ते तैनात होते.