पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami)

25

पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती ‍वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, (Krishna Janmashtami) श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो. जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. या दि‍वशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद अधिक ​प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो.

या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात़ त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. श्रीकृष्ण जन्माचा पाळणा झाल्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती अथवा चित्र यांची पूजा करावी. पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करावा.

श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये दिलेल्या ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही’, या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये ‘अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती निर्माण व्हावी’, यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी.’

सदर माहिती सनातनच्या ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ या ग्रंथातून घेतली आहे. अन्य सणांची माहिती जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचा – आजच खरेदी करा

गाेपाळकाला (दहीकाला)

विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला अन् सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

ईश्वराची अनेक प्रकृतींद्वारे अनंत प्रकटीकरण रूपे आहेत. अनेक तत्त्वांमध्ये एकत्वाच्या अनुभूतींद्वारा जी आनंदप्राप्ती होते, तो म्हणजे गोपाळकाला प्रसाद. त्याची गोडी अवर्णनीय असते.

गोकुळाष्टमी निमित्त होणारे गैरप्रकार रोखा !

  • हल्ली दहीकाल्याच्या निमित्ताने वाटमारी, बीभत्स नाच, महिलांची छेडछाड आदी गैरप्रकार सर्रास होतात.
  • लाखो रुपयांच्या दहीहंडी स्पर्धा आयोजित करून केले जाणारे उत्सवाचे व्यापारीकरण !
  • उत्सवासाठी तंबाखू, गुटखा आदींची विज्ञापने किंवा त्यांच्या उत्पादकांचे प्रायोजकत्व !
  • ४० फुटांहून अधिक उंचीवरील दहीहंडी फाेडण्यासाठी गाेविंदांची धाेकादायक कसरत !
  • या गैरप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होऊन उत्सवातून देवतेच्या तत्त्वाचा लाभ तर होतच नाही, उलट धर्महानी होते. वरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले, तरच उत्सवाचे पावित्र्य टिकून उत्सवाचा खरा लाभ सर्वांना होईल. असे करणे ही समष्टी स्तरावरची भगवान श्रीकृष्णाची उपासनाच आहे.
  • संदर्भ – सनातन संस्था संकेतस्थळ