राज्यातल्या महामार्गांच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत लवकर निर्णय घेऊन ही कामं मार्गी लावण्याचे निर्देश

44

राज्यातल्या राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत लवकर निर्णय घेऊन ही कामं मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांना दिले आहेत. 
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे हे प्रकल्प प्रलंबित आहेत.

राज्यात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयस्तरावर मुख्य सचिव या प्रकल्पांचा नियमित आढावा घेणार आहेत, त्यानंतर आपण स्वतः उपमुख्यमंत्र्यांसह दरमहा या प्रकल्पांचा आढावा घेणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. 
वडोदरा-मुंबई एक्सप्रेस मार्ग, अहमदनगर बायपास, रत्नागिरी-कोल्हापूर, कोल्हापूर-कागल, सांगली-सोलापूर, सुरत-नाशिक- अहमदनगर, अहमदनगर- सोलापूर- अक्कलकोट, पुणे-अहमदनगर- औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, नांदेड-जालना- अहमदनगर- पुणे अशा विविध महामार्गांच्या, तसंच रिंगरोडच्या कामांच्या सद्यस्थितीवर यावेळी चर्चा  झाली.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचं काम रेंगाळू नये यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर असलेल्या प्रलंबित बाबी पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.  

मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातल्या रस्त्यांची अतिवृष्टीमुळे होणारी स्थिती पाहता हे रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, त्याला गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवली. सार्वजनिक बांधकाम आणि इतर संबंधित खात्यांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.