नाशिक जिल्ह्यातल्या कांदा लिलावाचा तिढा कायम

92

नाशिकमध्ये कांदा लिलावाबाबत तिढा कायम आहे काल दुपारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समितीचे संचालक आणि कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली त्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असली तरी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी मर्यादा घालून दिलेली आहे त्यामुळे त्यापेक्षा अधिकचा कांदा घेऊन नियमाचे उल्लंघन करता येणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याचे वृत्त आहे.

  त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनीही शासनानं यासंदर्भात फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारनं कांद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्यात बंदी बरोबरच आता साठवणीतील मर्यादा घातली आहे २५ मेट्रिक टन इतका कांदा व्यापाऱ्यांना साठवता येणार आहे त्यामुळे साठवण मर्यादेपेक्षा अधिक कांदा खरेदी करून कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून लिलाव करणे बंद केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत.

  नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या पन्नास ते साठ हजार क्विंटल कांद्याची दररोज आवक होत असते, व्यापार्यांपनी लिलाव बंद केल्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दरम्यान व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडणार आहेत.