मुंबई – हिंदूंच्या श्रद्धा, अस्मिता आणि परंपरा यांना आजच्या व्यवस्थेत कोणतेही संरक्षण नाही. विज्ञापने, नाटके, चित्रपट, वेब सीरिज, स्टँड अप कॉमेडी आदी माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचे वाटेल तसे विडंबन केले जात आहे. केवळ हिंदुद्वेष आणि भारतद्वेष यांच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये काम मिळते, ही वस्तूस्थिती आहे. हिंदूंच्या देवतांची विटंबना करणारे कधी मेरी, फातिमा, आयेशा किंवा तत्सम नाव असणार्यांचे विडंबन करण्याचे धाडस करू शकतील का ? त्यामुळे ईश्वरनिंदकांना कठोर शासन व्हावे, यासाठी सरकारकडे ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी करा, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
ते ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर वेदमंत्रपठण अणि क्रांतीकारक यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी ऑनलाईन स्वरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सभेत श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच अखिल भारतीय वीरशैवर लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे फलकप्रदर्शन, संकेतस्थळ, तसेच उत्पादने यांच्या संदर्भातील एक चलचित्र दाखवण्यात आले. यू ट्यूब द्वारे १० सहस्रांहून अधिक जणांनी ही सभा ऑनलाईन पाहिली.
सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले,
१. कोरोनाच्या निमित्ताने संपूर्ण जग सनातन हिंदु धर्माकडे मोठ्या आशेने पहात आहे. यापूर्वी हस्तांदोलन करणे, हा शिष्टाचार मानला जात असे; पण कोरोनाच्या काळात या कथित शिष्टाचाराचा भोंदूपणा समोर आला. या निमित्ताने पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण किती अवैज्ञानिक होते, हे दिसून आले. संपूर्ण जगाने हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत स्वीकारली. योग, प्राणायाम, आयुर्वेद, शुचिर्भूतता, मन:शांती आणि अध्यात्म यांकडे आज जगभरातील लोक आकर्षित होत आहेत.
२. अनेक द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी आगामी आपत्काळाविषयी सूचित केले आहे. आज तिसर्या महायुद्धाची टांगती तलवार सर्वांच्या डोक्यावर आहे. या महायुद्धाची ठिणगी कधी कुठे पडेल, ते सांगता येणार नाही. याला सामोरे जाण्यासाठी व्यक्तीच्या शारीरिक सक्षमतेसमवेत मनोबल आणि आत्मबल उत्तम असणे आवश्यक आहे. हे मनोबल पैशांनी विकत घेता येऊ शकत नाही, तर त्यासाठी साधनाच करावी लागते. कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली असल्याने प्रतिदिन कुलदेवतेचा नामजप करावा.
३. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. आज बहुतांश ठिकाणची मंदिर-संस्कृती लोप पावत असून मंदिरांचीही दूरवस्था झाली आहे. सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरांमध्ये पुष्कळ भ्रष्टाचार होत असून हिंदूंनी दिलेल्या दानाची अन्य पंथियांसाठी उधळपट्टी होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियान हे एक देशव्यापी अभियान उभारण्यात आले आहे. या अभियानामध्ये सहभागी होऊन मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी यथाशक्ती योगदान द्यावे.