News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई, दि.१५ – अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलीनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येथे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देवून पाहणी केली आहे.

जातीय दंगली रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने जातीय दंगली घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेऊ नये, समाज माध्यमांवर कोणतीही पोस्ट टाकताना काळजीपूर्वक आणि जबाबदारीने टाकावी, आपण केलेल्या पोस्टमुळे सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले आहे.