News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

वाल्मीकि रामायणाचा संदर्भ देऊन धर्मद्रोही रामाविषयी करत असलेला अपप्रचार – ‘राम दारू पीत होता आणि मांस भक्षण करत होता !’

‘सध्या बर्‍याचदा रामायणावर टीका करतांना काही टीकाकार ‘राम दारू पीत होता आणि तो मांस भक्षण करत होता’, असा अपप्रचार करतात. त्यासाठी धर्मद्रोही टीकाकार वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देऊन म्हणतात, ‘‘वाल्मिकी रामायणात सीतेच्या तोंडी ‘मी मद्य, मांस अर्पण करीन’, असा उल्लेख आहे. आपण जे नेहमी वापरतो, तेच आपण अर्पण करतो. त्यामुळे ज्याअर्थी रामायणात मद्य आणि मांस अर्पण करण्याचा उल्लेख आहे, त्याअर्थी मद्य आणि मांस त्या काळातही नेहमीच्या वापरातील असावेत. म्हणजेच राम, सीता आदी मद्य आणि मांस सर्रास भक्षण करत असावेत.’’ याविषयी युक्तीवाद करतांना ते पुढील श्लोकाचा संदर्भ देतात.

सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च।
यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता ।।

– वाल्मीकिरामायण, कांड २, सर्ग ५२, श्लोक ८९

‘सुराघटसहस्रेण’ या शब्दाचा अयोग्य अर्थ लावून टीकाकार वरील श्लोकाचा काढत असलेला अयोग्य अर्थ

वरील श्लोकामधील ‘सुराघटसहस्रेण’ या शब्दाचा अर्थ धर्मद्रोही टीकाकार ‘मद्याचे सहस्रावधी घडे’ असा अयोग्य घेतात आणि श्लोकाचे ‘हे देवी, अयोध्येला पुन्हा आल्यावर मी मद्याचे सहस्रावधी घडे आणि मांसाहारी अन्न वाढून तुझी पूजा करीन. तू माझ्यावर प्रसन्न हो’, असा अयोग्य अर्थ लावतात.

‘सुराघटसहस्रेण’ सामासिक शब्दाचा विग्रह केल्यावर निघणारा योग्य अर्थ

वरील श्लोकामधील ‘सुराघटसहस्रेण’ या सामासिक शब्दाचा विग्रह पुढीलप्रमाणे आहे.

सुरेषु देवेषु न घटन्ते न सन्तीत्यर्थः ।
तेषां सहस्रं तेन सहस्रसंख्याकं सुरदुर्लभपदार्थेन इत्यर्थः ।।’

अर्थ : सुर म्हणजे देव. ‘त्यांना (देवांना) जे प्राप्त होत नाही, अशा सहस्रावधी देवदुर्लभ पदार्थांनी’ असा याचा अर्थ होतो.

‘मांसभूतौदनेन’ या शब्दाचा केलेला विग्रह आणि त्यातून निघणारा योग्य अर्थ

मा नास्ति अंसो राजभागो यस्या सा एव भूः पृथ्वी च उतं वस्त्रं च ओदनं च एतेषां समाहारः ।

अर्थ : मा म्हणजे नाही. अंस म्हणजे राजकीय भाग. राजकीय भाग रहित अशी पृथ्वी म्हणजे मांसभू. उत म्हणजे वस्त्र. ओदन म्हणजे अन्न. ‘मांसभूतौदनेन’ म्हणजे ‘मांसभू, उत आणि ओदन यांच्या समुहाने’.

वाल्मीकि रामायणातील श्लोकाचा प्रत्यक्षातील योग्य अर्थ : हे देवी, पुन्हा अयोध्यापुरीत परत आल्यावर मी सहस्रो देवदुर्लभ पदार्थांनी; तसेच राजकीय भागरहित पृथ्वी, वस्त्र आणि अन्न यांच्याद्वारे तुझी पूजा करीन. तू माझ्यावर प्रसन्न हो.

यातून टीकाकारांची बौद्धिक दिवाळखोरीच उघड होते. सध्या कुणीही येतो आणि हिंदूंच्या देवतांवर चिखलफेक करतो; पण हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच ते अपप्रचारांना बळी पडतात. त्यामुळे हिंदूंनी आपल्या देवतांविषयीच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता स्वतः धर्मशिक्षण घ्यावे आणि अशी टीका करणार्‍या धर्मद्रोह्यांना भेटतील तेथे वैध मार्गाने खडसवावे.

– श्री. अमर जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संदर्भ – दैनिक सनातन प्रभात )