News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

अहमदनगर: शिर्डी येथील श्रीसाई मंदिर करोनामुळे १७ मार्च रोजी बंद करण्यात आले होते. आता राज्य सरकारने उद्या, पाडव्यापासून धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी साई मंदिर उघडले जाणार आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात एकाचवेळी दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी आज शिर्डी येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होत आहे.

राज्यामध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यासोबतच सर्व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. आता राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, शनिवारी तसे जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिर्डी येथील साई मंदिर भाविकांसाठी उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या, पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर उघडल्यानंतर प्राधान्याने शिर्डी येथील ग्रामस्थांना टप्याटप्याने दर्शन देण्यात येणार आहे. मात्र, यावेळी गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनासाठी टोकन दिले जाणार आहे. तर, शिर्डीबाहेरील भाविकांना ऑनलाइन पद्धतीने पास काढून दर्शनासाठी यावे लागणार आहे.

दहा वर्षाच्या आतील मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनाची परवानगी नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे.

संदर्भ व अधिक माहिती – महाराष्ट्र टाईम्स