राज्याचे विरोधीपक्षनेते मा.अजित पवार यांची मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू होती. त्यावर आज स्वतः अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व मीडियाची बोलती बंद केली.

पवार राष्ट्रवादीला सोडून भाजप मध्ये जाणार किंवा दुसरा काही निर्णय घेणार या अफवांना राज्यात पेव फुटले होते. मात्र त्यावर बोलताना अजित पवारांनी, आम्ही सर्वजण राष्ट्रवादीसोबतच आहोत. जिवात जीव आहे तोवर राष्ट्रवादीत राहणार. कामासाठी मला वेगवेगळ आमदार भेटले. त्याचा वेगळा अर्थ काढू नका, असा खुलासा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

तसेच ४० आमदारांच्या सह्यांविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “४० आमदारांच्या सह्या असणारं कुठलंही पत्र नाही. माध्यमांनी आणि सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी ह्या वावड्या उठवल्या आहेत. मी राष्ट्रवादीत राहणार आहे. आता काय प्रतिज्ञा पत्रावर लिहून देऊ का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या अफवेवरून मिडीयाला अभ्यासपूर्वक बातम्या देण्याची गरज आहे असे वाटते. उगाचच उठ सुठ “ब्रेकिंग न्यूज” च्या नावाखाली एखादी तथ्य नसलेली बातमी चालवू नये.