नाशिक – टंचाईसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलसमृद्ध नाशिक अभियानास १५ एप्रिलपासून प्रारंभ होत असून, या अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, लोकसहभाग व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानातून हरित नाशिक व पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकार करावयाचा आहे. येत्या १५ एप्रिल ते १५ जून २०२४ या कालावधीत या अभियानाची गंगापूर धरणापासून सुरवात करण्यात येणार असून, जिल्ह्यातील इतर धरणे, नदी व जलाशयात ते राबविले जाणार आहे.
धरणांमध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ लोकसहभागातून काढला जाणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. यातून मोठ्या जलाशयांची पाणीसाठवण क्षमता वृद्धीस लागून शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होवून उत्पादनक्षमता वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी जलज शर्मा पुढे म्हणाले, गत वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी जलसमृद्ध नाशिक या अभियानातून गावागावात लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या अभियानात सहभागी करून घेण्याची ही उत्तम संधी आहे.

