रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती त्यानिमित्ताने

14

रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती आहे. रामकृष्ण परमहंसांचे मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय असे आहे. भारतातील एक संत, आध्यात्मिक गुरू, विचारवंत, तत्त्वज्ञ आणि स्वामी विवेकानंदांचे गुरू अशी त्यांची ओळख आहे. रामकृष्ण परमहंस यांचे खरे नाव गदाधर चट्टोपाध्याय होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८३६ रोजी कामारपुकुर, पश्चिम बंगाल येथे एका गरीब वैष्णव ब्राह्मण कुटुंबात झाला.  मकृष्ण परमहंस लहानपणापासूनच काली मातेचे निस्सिम भक्त होते. दिवस-रात्र ते काली मातेच्या पूजनात लीन असत. काली मातेचे दर्शन व्हावे, यासाठी वयाच्या १७ व्या वर्षी कुटुंबाचा त्याग करून आपले सर्वस्व काली मातेच्या चरणी अर्पण केले. वडील खुदीराम यांचा रामकृष्णांवर विशेष प्रभाव होता.

रामकृष्णांच्या स्मृतीनुसार सहा-सात वर्षांचे असल्यापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक भावतन्मयता दिसू लागली. एकदा शेतात चालता चालता आकाशातील काळ्या मेघांच्या पांढऱ्या कडेस मोहित होऊन ते बाह्यज्ञानरहित झाले, नंतर आपल्या या अवस्थेचे त्यांनी अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती असे वर्णन केले आहे.  बाल्यकाळात त्यांची भावतन्मयता – एकदा देवी विशालाक्षीच्या पूजेच्या वेळी व एकदा शिवरात्रीच्या जत्रेत शंकराचा अभिनय करतेवेळी दिसली होती.

१८५५ साली कलकत्त्याच्या अस्पृश्य कैवर्त समाजातील एका धनिक जमीनदार पत्नी राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले. निम्नवर्णीय स्त्रीचे प्रतिष्ठित मंदिर असले तरी गदाधर कोणताही वेगळा भाव न बाळगता तेथे जात. त्यांनी तेथे भाऊ रामकुमार यांचे सहकारी म्हणून मूर्तीच्या साजसज्जेचे दायित्व स्वीकारले. १८५६ साली रामकुमारांच्या मृत्यूनंतर गदाधरांनी त्यांची जागा घेतली. मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात त्यांना एक छोटीशी खोली देण्यात आली. येथेच त्यांनी जीवनाचा बहुतांश काळ घालवला. एका अंदाजानुसार राणी रासमणीचे जावई मथुरामोहन विश्वास यांनी गदाधरास ‘रामकृष्ण’ असे नाव दिले. दुसऱ्या मतानुसार हे नाव त्यांचे एक गुरू तोतापुरी यांनी दिले आहे. रामकृष्ण परमहंस खऱ्या अर्थाने जगविख्यात बनले ते म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे गुरू म्हणून! परमहंस देव यांना त्यांचे सर्व शिष्य आणि आप्तेष्ट हे ईश्वरी अवतार मानत असत. सुरुवातीच्या जीवनात रामकृष्ण हे काली भक्त म्हणून प्रसिद्ध होते. भक्ती आणि गूढता यामध्ये रामकृष्ण पारंगत होतेच परंतु ती केवळ भावना होती. त्यांना देवी काली खरोखर दर्शन देत असे. ऊर्जा आणि भावना यांचा खऱ्या अर्थाने जम बसवण्यात ते कुशल बनले होते. तंत्र आणि वैष्णव भक्ती यांत त्यांना परमानंद जाणवत होता.

१८६१ साली भैरवी ब्राह्मणी यांच्याशी रामकृष्ण यांची भेट झाली. भावनिक आणि अध्यात्मिक शक्तीमुळे रामकृष्ण यांचे शरीर आणि मन असह्य वेदना सहन करत होते. त्या वेदनेचा अंत करण्यासाठी भैरवी ब्राह्मणी यांनी रामकृष्ण यांस तंत्रसाधना करण्यास सांगितली. त्या साधनेमुळे रामकृष्ण बरे होत गेले. तंत्र आणि मंत्र साधना पूर्ण करण्यासाठी रामकृष्ण यांना दोन वर्षे एवढा कालावधी लागला. रामकृष्ण हे भैरवी ब्राह्मणी यांस मातृभावनेने पुजत असत. तर भैरवी या रामकृष्ण यांस अवतार मानत असत. भैरवी यांनी त्यानंतर कुमारी पूजेची दीक्षा दिली ज्यामध्ये कुमारिकेला देवी समजून तिची पूजा करावी लागते.

रामकृष्ण यांनी १६ ऑगस्ट १८८६ रोजी महासमाधी घेतली. त्यांच्या महासमाधीनंतर त्यांचे परमशिष्य स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेद्वारे त्यांचे धर्मकार्य सुरू ठेवले. रामकृष्ण यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचे काम ही संस्था करते.

माहिती संदर्भ – विकिपीडिया