Mumbai - Shops charged double property tax
Mumbai - Shops charged double property tax

मुंबई – जी दुकाने आणि आस्थापने नावाची पाटी मराठी भाषेत लावणार नाहीत, त्यांना १ मेपासून दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आहे, असा आदेश मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला. दुकाने आणि आस्थापने यांनी मराठी भाषेत फलक लावण्याविषयी केलेल्या कार्यवाहीचा गगराणी यांनी ८ एप्रिल या दिवशी आढावा घेतला. त्यांनतर त्यांनी वरील निर्देश दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील दुकाने आणि आस्थापने यांनी मराठी भाषेत नावाचा फलक लावण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर कार्यवाहीसाठी ६ मासांचा कालावधीही देण्यात आला होता; मात्र त्यानंतरही काही दुकाने आणि आस्थापने यांनी मराठी भाषेत नामफलक लावले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह जी दुकाने आणि आस्थापने मराठी भाषेतील नामफलक लावणार नाहीत, त्यांचा प्रकाशित फलक (ग्लो साईन बोर्ड) लावण्याचा परवाना रहित करण्याची तंबीही मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

३१ मार्चपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने मुंबईमधील ८७ हजार ४७ दुकाने आणि आस्थापने यांची पहाणी केली. त्यामध्ये ८४ हजार ७ दुकानांनी नियमानुसार फलक लावल्याचे आढळून आले. ३ हजार ४० दुकानांचे फलक नियमानुसार नसल्याचे आढळून आले. सर्व आस्थापने आणि दुकाने यांना यापूर्वी प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत १७७ प्रकरणांमध्ये मराठीत पाटी नसल्याच्या कारणावरून न्यायालयाने दंड ठोठावला असून त्यांना १३ लाख ९४ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. अद्यापही १ हजार ७५१ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे.