उष्माघातापासून (Heat Stroke) स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबियांचा बचाव करा 

23

नाशिक – सध्या शहराच्या तापमानात वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशन (जलशुष्कता) मुळे मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे नाशिक महापालिकेतर्फे उष्माघातापासून (Heat Stroke) स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबियांचा बचाव करा असे जाहिर आवाहन  निवेदनाद्वारे सर्व नागरिकांना  करण्यात येत आहे. 

सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… http://thalaknews.com/join-our-group

उष्माघात होण्याची कारणे :- प्रखर उन्हात शारिरीक श्रमाची, अंग मेहनतीची व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.

लक्षणे :- मळमळ, उलटी, हात-पायांत गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी • पडणे. क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्धावस्था इ.

प्रतिबंधक उपाय :- वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विभांती घेऊन पुन्हा काम करावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल, पांढऱ्या किया फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे, बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नये, गरज पडल्यास जलसंजीवनीचा वापर करावा. लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळपाणी इ. प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इ. चा वापर करावा. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कृलसं. एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या मनपाच्या आरोग्य केंद्र / रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा.

उष्माघातावर त्वरीत उपचार करणे आवश्यक असते. रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरीत उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरीत अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कूलर्स, एअर कंडिशनर्स त्वरीत चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व ३६.८ सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. रुग्णाने नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रात, केंद्र / रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा व रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ Ambulance साठी कॉल करावा.