News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात ‘गुढीपाडवा’. गुढीपाडव्याचे महत्त्व – तिथी – युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा (Gudhipadwa)

ठळकन्यूज व्हाटस्अप ग्रुप मध्ये क्लिक करून शामिल  व्हा  !

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

ज्योतिषशास्त्रानुसार – पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक महत्त्व – या दिवशी रामाने वालीचा वध या दिवशी केला. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला. महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंंद्राच्या आदरार्थ भूमीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा समादेश देतो. महाभारतातील आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे.

आध्यात्मिक महत्त्व – ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. गणेशयामल या तंत्रग्रंथात ‘नक्षत्रलोकातील (कर्मदेवलोकातील) २७ नक्षत्रांपासून निघालेल्या २७ लहरींचे अजानजलोकात प्रत्येकी चार चरण (विभाग) होऊन पृथ्वीवर २७ x ४ = १०८ लहरी येतात’, असे सांगितले आहे. त्यांच्या विघटनाने यम, सूर्य, प्रजापति आणि संयुक्‍त अशा चार लहरी होतात.

गुढी हे मानवी शरिराचे प्रतीक असणे –

‘वीर्य बिजाचा आकार १ या अंकाप्रमाणे असतो. शरिरात डोके शून्याच्या आकारासारखे आणि मेरुदण्ड म्हणजे त्याची शेपटी (कणा) हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच गुढीपाडव्याला कळकाच्या काठीवर गडू ठेवून (मानवाकृती करून) त्याची पूजा करतात. काठी म्हणजे मेरुदण्ड आणि गडू म्हणजे मानवाचे डोके. कळकालाही आपल्या पाठीच्या कण्याप्रमाणे मणके असतात.’ – – प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ४७)

‘नित्य प्रलय, मासिक प्रलय, वार्षिक प्रलय, युग-प्रलय, ब्रह्मदेवाचा प्रलय, असे अनेक प्रलय आहेत. सर्वांची गती आणि स्थिती सारखीच असल्यामुळे ‘एकाचे वर्णन करतांना दुसर्‍याचे रूपक केले’, असे वाटते; पण तसे नाही. एक वार्षिक प्रलय संपून पुन्हा नवनिर्मिती चालू होण्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसालाच ‘पाडवा’, असे म्हणतात.’ ‘शिमग्याच्या काळात भेदभाव टाकून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे अव्यवस्था निर्माण होते. ही अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

चैत्र मास उन्हाळ्यात येतो. या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये; म्हणून एक औषध सांगितले आहे. पाडव्याच्या दिवशी हे औषध सर्वांनी घ्यायचे असते. ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो, त्यांनी नंतरसुद्धा हे औषध घ्यायला आडकाठी नाही. – कडुलिंबाची कोवळी पाने अणि फुले, मिरे, हिंग, मीठ, कैरी, साखर अन् चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले वाटावे आणि औषध म्हणून घ्यावे. जून पानांत शिरा असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुण अल्प होतो; म्हणून विशेषकरून मिळतील तितकी कोवळी पानेच घ्यावीत.

गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे मंत्रांसह वाचकांसाठी इथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.

ब्रह्मध्वज पूजा विधी ( गुढी पूजन कसे कराल )

संदर्भ – दैनिंक सनातन प्रभात.