Narasimha image by - https://www.pxfuel.com/

भगवान श्रीविष्णूंचा चौथा अवतार, म्हणजे नृसिंह अवतार (Narasimha Avatar) होय. उद्या म्हणेच गुरुवार ४ मे २०२३ रोजी भगवान नृसिंह यांची जयंती आहे. विदर्भात आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. त्या निमित्ताने नृसिंहाची आध्यात्मिक माहिती देणारा हा लेख.

उद्या गुरुवारी (४ मे २०२३), संपूर्ण भारतभर भगवान विष्णूचा अवतार भगवान नरसिंह (Narasimha Avatar) यांची जयंती साजरी केली जाणार आहे. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला नरसिंह जयंती साजरी केली जाते. पुराणानुसार या दिवशी भगवान श्री विष्णूने भक्त प्रल्हादच्या रक्षणासाठी नरसिंहाचा अवतार घेतला होता. या कारणास्तव हा दिवस संपूर्ण भारतभर भगवान नरसिंहाची जयंती म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी भगवान श्री नरसिंह कल्याणी यांची जयंती 4 मे रोजी साजरी केली जाणार आहे.

नृसिंह अवताराचे कार्य आणि वैशिष्ट्ये – हिरण्यकश्यपूने चालवलेला पराकोटीचा अधर्म नष्ट करून प्रल्हादासारख्या भक्तांच्या रक्षणार्थ हा अवतार सगुणात साकारला. अधर्मीय शक्ती कितीही बलशाली, उन्मत्त आणि वरदानाने अहंकारी झाल्या, तरी शेवटी धर्माचाच विजय होतो, हे आध्यात्मिक तत्त्व सिद्ध करून दाखवण्यासाठीच हा सिंहमुखी अवतार प्रकटला. त्याने अधर्मियांचा नाश करून श्रीमद्भगवद्गीतेनुसार (अध्याय ४ श्‍लोक ८ यानुसार) पुढील वचन पूर्ण केले.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

नृसिंह अवतार अतिशय शक्तीशाली आणि उग्र स्वरूपात प्रगटला; कारण शत्रूची जशी शक्ती आणि वरदानप्राप्ती असते, त्याला स्मरून अवतार प्रकट होतो. नृसिंह अवताराची (मूर्तीतील) शक्ती (प्रकटशक्ती) भाविक आणि सर्वसामान्य भक्तगण सहनच करू शकत नाहीत. त्यामुळे नृसिंहाची मूर्ती उपडी (भूमीकडे मुख करून) झोपवून भाविकांना दर्शनासाठी ठेवतात.

श्री नृसिंह अवतारासंबंधी काही तत्त्वे (रहस्ये) ! – श्रीविष्णूने भक्तांच्या हृदयातील आर्त हाकेला
धावून अवतार धारण करून स्वतःच्या ब्रीद वचनाचे पालन करणे. भक्ताने भक्तीद्वारे भगवंताला सगुण रूपात आणणे. भगवंताने निर्जीव खांबातून प्रकट होऊन अश्रद्ध मानवाला चराचरांतील स्वतःचे अस्तित्व दाखवून देणे.

भगवंताच्या सर्व शक्तींमध्ये भक्ताची प्रेमशक्तीच सर्वांत महत्त्वाची असणे – खांबातून नृसिंह अवतार प्रकट झाल्यावर अत्यंत कोपीष्ट भासत होता. त्यामुळे लक्ष्मीसुद्धा त्याच्या जवळ जाण्याचे धाडस करू शकली नाही. सर्व देव-देवताही नृसिंहाचा क्रोध (आवेश) शांत करू शकले नाहीत; परंतु भक्त प्रल्हादाच्या प्रेम आणि शक्तीयुक्त भक्तीमुळेच तो शांत झाला. भगवान विष्णूंनीच या अवतारामधून भगवंताच्या सर्व शक्तींमध्ये भक्ताची प्रेमशक्तीच सर्वांत महत्त्वाची असते, हे रहस्य भक्तगणांना शिकवले आहे. हे पाचवे तत्त्व आहे. भगवान विष्णूने नृसिंह अवतारामध्ये सिंहमुख धारण करून विष्णुमायेची सर्वोच्च लीला (भगवंताची माया आणि तिचा आवेग किती असतो ?, हे) नर-पशूचे रूप धारण करून ब्रह्मांडाला दाखवून दिली आहे. हे सहावे तत्त्व मायेची महती आणि शक्ती दाखवून देते. या प्रसंगी भगवंताने अधर्मियांना (अधर्मियांच्या मायेला) काही पत्ता लागू न देता कसे नष्ट करतो; म्हणजेच भगवंताची सर्वशक्तीमानता कशी कार्यरत असते ?, हे त्याने पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. भगवंताने ब्रह्मांडात केवळ एकच शक्तीमान असे तत्त्व कार्यरत आहे, याचा धडाही या तत्त्वातून दिला आहे.

नृसिंह हा तीन अक्षरी नामजप केल्याने होणारे लाभ – युद्धात विजय प्राप्त करून घेता येतो. दुर्लभ वस्तूंची प्राप्ती करून घेता येते. हा तीन अक्षरी नामाचा दहा सहस्र जप केल्यास भैरव प्रसन्न होतो. सर्व शत्रूंचा नाश होतो. नृसिंह उपासकाला उत्तम गती प्राप्त करून देतो. केवळ स्मरणाने तो आपल्या भक्तांचे रक्षणही करतो. भुते दिसल्यास नृसिंह या मंत्राचा जप करावा.

श्री. श्रीकांत भट, अकोला. ( संदर्भ – सनातन संस्था संकेतस्थळ)