नाशिक – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये आणि जलकुंभांमध्ये अत्याधुनिक SCADA (Supervisory Control and Data Acquisition) प्रणाली बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. या तांत्रिक कामासाठी नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १० मे २०२५ रोजी संपूर्ण दिवसभर आणि ११ मे रोजी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती दिली आहे.
या कालावधीत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या सबस्टेशनची चाचणी घेण्यात येणार असून, त्याचे कार्यान्वयन देखील करण्यात येईल. त्यामुळे या दोन दिवशी काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. तात्पुरती गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपली तयारी ठेवा:
१० मे रोजी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद
११ मे रोजी सकाळी पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता
जलशुद्धीकरण केंद्रांवर SCADA प्रणालीची चाचणी व कार्यान्वयन.






