महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने (Covid-19) डोके वर काढले असून, गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच पुण्यातही काही रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागरिकांना घाबरू नये, असं स्पष्ट आवाहन केलं आहे. “राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत, पण घाबरण्याचं कारण नाही. सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,” असं ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, राज्य सरकार आणि आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहेत. सध्या रुग्णांचे मॅपिंग सुरू असून, आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असला, तरी तो कोरोना मुळे नाही, तर सहव्याधींमुळे झाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

आरोग्य सेवा सक्षम असल्याचं सांगत आबिटकर म्हणाले, “को-मॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेतली पाहिजे. हाँगकाँगवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्राकडून जर SOP आली, तर आम्ही त्याचे पालन करू. सध्या अशी कोणतीही सूचना आली नाही.”

तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (PHC) संदर्भातही काम सुरु आहे. काही केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले असून, लवकरच तेथील सेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहितीही आबिटकर यांनी दिली.