पुणे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (IUCAA) चे संस्थापक संचालक डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात मंगळवारी निधन झाले. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे जन्मलेले नारळीकर हे प्रख्यात गणितज्ञ प्रो. विष्णू नारळीकर यांचे पुत्र. त्यांचे शिक्षण वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात झाले. १९५७ मध्ये त्यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली आणि नंतर केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. तेथे त्यांनी ‘रॅंगलर’ व ‘टायसन मेडलिस्ट’ म्हणून विशेष यश संपादन केले.

१९७२ ते १९८९ या काळात ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत होते. याच दरम्यान १९८८ मध्ये त्यांनी IUCAA या भारतातील एक महत्त्वपूर्ण खगोल संशोधन संस्थेची स्थापना केली. त्यांनी ‘बिग बँग’ सिद्धांताला पर्यायी कल्पना मांडून आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख निर्माण केली.

डॉ. नारळीकर यांना वयाच्या केवळ २७व्या वर्षी ‘पद्मभूषण’ (१९६५) आणि नंतर २००४ मध्ये ‘पद्मविभूषण’ या राष्ट्रपदकांनी गौरविण्यात आले. विज्ञानाबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’, ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘टाइम मशीनची किमया’ यांसारख्या विज्ञानकथांनी मराठी वाचकांमध्ये विज्ञानप्रेम जागवले.

१९६४ मध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा महत्त्वाचा सिद्धांत मांडला, ज्यामुळे त्यांचे नाव संपूर्ण देशभर पोहोचले. विज्ञान संमेलनांचे अध्यक्षपद, व्याख्यानमालेतून केलेला विज्ञानप्रसार आणि सामान्य माणसासाठी विज्ञान समजावून देण्याचा त्यांचा प्रयत्न सदैव लक्षात राहील.

डॉ. जयंत नारळीकर हे केवळ वैज्ञानिक नव्हते, तर विज्ञानाला सामान्यांपर्यंत नेणारा एक द्रष्टा साहित्यिक आणि भारताच्या वैज्ञानिक वारशाचा तेजस्वी तारा होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.