लसणीचे औषधी उपयोग

52

‘जेवणात चव आणणार्‍या पदार्थांमध्ये लसणीचे स्थान महत्त्वाचे आहे. पदार्थ पचण्यासाठी लसूण वापरतात. लसणीचे मूळ तिखट, पाने कडू, देठ खारट, नाळ तुरट आणि बी मधुर (गोड) चवीची आहे. लसणीत सहा रसांपैकी (चवींपैकी) केवळ आंबट रस नाही.

लसूण उष्ण आणि तीक्ष्ण (उग्र किंवा भेदक गुणाची) असल्याने पित्ताचा त्रास असणार्‍यांनी खाऊ नये.

गरोदर स्त्रियांसाठी लसूण वर्ज्य आहे.

नाका-तोंडातून रक्त येत असल्यास लसूण खाऊ नये.

लसणीचे औषधी उपयोग

तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास बसलेला आवाज सुधारतो. खेडेगावात लहान मुलांना खोकला झाल्यास लसणीची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. दम लागत असतांना लसूण खाल्ल्यास दम लागणे न्यून होते. एकदा जेवल्यानंतर मला उचकी लागली आणि ती थांबेना. मी लसणीच्या २ – ४ पाकळ्या खाऊन त्यावर घोटभर पाणी प्यायलो. नंतर थोड्या वेळाने २ चमचे साखर खाल्ली. याने माझी उचकी लगेच थांबली. प्रतिदिन लसणीच्या १० ते २० पाकळ्या ठेचून उशाजवळ ठेवल्यानेे क्षयाच्या जंतूंचा नाश होतो.

लहान मुलांना होणार्‍या जंतांवर त्यांना लसूण खाण्यास द्यावी. लसूण तिखट असल्याने लहान मुले खाऊ शकत नाहीत; म्हणून लसणीच्या पाकळ्या दिवसभर दह्यामध्ये चांगल्या भिजवून नंतर सोलाव्यात आणि घरी बनवलेल्या तुपात लालसर होईपर्यंत तळाव्यात. मुलांच्या वयोमानाप्रमाणे खायला द्याव्यात. याने चांगली भूक लागते आणि जंतांचे प्रमाण न्यून होते.

प्रतिदिन लसूण खाणार्‍या स्त्रीचे सौंदर्य, बळ आणि आयुष्य वाढते. त्यांना गर्भाशयाचे विकार होत नाहीत; मात्र लसूण अधिक न खाता प्रमाणातच खावी.

लसणीच्या वाटलेल्या पाकळ्या अर्धी वाटी, १ लिटर मोहरीचे तेल आणि २ लिटर दह्याचे पाणी (दह्यापासून श्रीखंडासाठी चक्का बनवतांना शेष राहिलेले पाणी) एकत्र करून मंद गॅसवर केवळ तेल शिल्लक राहीपर्यंत आटवावे. शरिराच्या दुखणार्‍या भागावर हलक्या हाताने थोडा वेळ हे तेल चोळावे.

कीडा चावल्यास त्या जागेवर लसूण चोळावी. याने किड्याचे विष उतरण्यास साहाय्य होते.’

संदर्भ – सनातन संस्था वेबसाईट sanatan.org