अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, तर १५ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत एखाद्या दिवशी गर्भगृहातील श्रीरामाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येईल. मंदिरातील प्रत्येक कलाकृती आणि भाग अशा प्रकारे बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे की, पुढील १ सहस्र वर्षे त्याला काहीही होणार नाही, तसेच त्याच्या डागडुजीचीही आवश्यकता भासणार नाही, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी १६ जुलै या दिवशी दिली.
राय पुढे म्हणाले, श्रीराम पंचायतन तळमजल्यावर स्थापन करण्यात येणार आहे. मंदिराच्या बांधकामात सध्या २१ लाख घनफूट ग्रॅनाइट, संगमरवर आदी वापरण्यात येत आहे. श्रीराममंदिराची चौकट संगमरवरी आहे, तर दरवाजे महाराष्ट्रातील सागवान लाकडापासून बनवण्यात आले आहेत. त्यावर कोरीव कामही चालू झाले आहे. मंदिराच्या तळमजल्यावर १६२ खांब उभारण्यात आले असून त्यांमध्ये ४ सहस्र ५०० हून अधिक मूर्ती कोरल्या जात आहेत. यात त्रेतायुगाची झलक पहायला मिळणार आहे. यासाठी केरळ आणि राजस्थान या राज्यांमधून ४० कारागिरांना पाचारण करण्यात आले आहे. एका कारागिराला एका स्तंभावर मूर्ती कोरण्यासाठी अनुमाने २०० दिवस लागतात.