इस्लामाबाद (पाकिस्तान) – व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, देशात व्यवसाय आणि गुंतवणूक यांसाठी चांगले वातावरण उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे, असे सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या पाकिस्तानच्या सर्व सरकारी आस्थापने विकण्याचा निर्णय घोषित केला. येथे झालेल्या खासगीकरण आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या डिसेंबर २०२३ च्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये ८८ सरकारी आस्थापने आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, सर्व सरकारी आस्थापने नफा कमावत असोत किंवा नसोत त्या विकल्या जातील. सरकार केवळ अशाच आस्थापनांना कायम ठेवणार आहे ज्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व मंत्र्यांनी खासगीकरण आयोगाला सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
आस्थापनांचा लिलाव होणार !
आस्थापनांच्या विक्रीची प्रक्रिया पारदर्शकतेने पूर्ण केली जाईल, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. सर्वप्रथम ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’ आस्थापनाचे खासगीकरण केले जाणार आहे. यासाठी लिलाव आयोजित करण्यात येईल आणि त्याचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाहिन्यांवरून केले जाणार आहे.