News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई, दि. 10– “आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचं पुनर्जीवन केलं. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचं महत्वं घराघरात पोहचवलं. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गूण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण  करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. श्री. बालाजी तांबे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारताच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचारपद्धतीला आधुनिक स्वरुप देऊन समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. आयुर्वेदाचं महत्वं सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हजारो लेख लिहिले. दूरचित्रवाणीवरुन संवाद साधला. आयुर्वेदातील गुणकारी औषधं त्यांचा उपयोग याचं ज्ञान देशविदेशात पोहचवलं. सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगितलं. आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेचा दस्तावेज तयार करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या दस्तावेजातून भारतीय आयुर्वेदाचं ज्ञान, महत्त्वं भावी पिढ्यांसाठी चिरंतन राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी श्री. बालाजी तांबे यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं.