द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती !

9

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती बनल्या आहेत. त्यांच्या विरोधात निवडणूक लढणारे काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा दारूण पराभव झाला आहे. ६४ वर्षीय मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. या निवडणुकीत मतदानाच्या वेळी तृणमूल काँग्रेसचे मतदार अनपेक्षितपणे अनुपस्थित राहिले.

या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान झाले होते. मुर्मू या २५ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. ‘मुर्मू यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी ठरेल’, असा विश्‍वास भाजपचे पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केला. मुर्मू या मे २०१५ ते जुलै २०२१ या कालावधीसाठी झारखंडच्या राज्यपाल राहिल्या होत्या. त्या मूळच्या ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशभर आनंदोत्सव साजरा केला.