युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. जर्मनीमध्ये कोरोनाची २ लाख ९६ सहस्र ४९८ नवीन प्रकरणे आढल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या १ कोटी ९८ लाख ९३ सहस्र २८ इतकी झाली आहे. फ्रान्समध्येही कोरोनाचे दीड लाख नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपीय देशांमध्ये आतापर्यंत १ कोटी २८ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ‘मॉडर्ना’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बन्सल म्हणाले की, कोरोनाचा नवा प्रकार आधीच्या प्रकारापेक्षा २० टक्के अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियामध्ये प्रतिदिन ५ लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. इटलीमध्ये कोरोनाचे ८१ सहस्र ८११ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर त्याच्या आदल्या दिवशी तेथे ७६ सहस्र २६० प्रकरणे नोंदवण्यात आली होती. ब्रिटनमध्येही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमायक्रॉन बीए.२’ या उपप्रकाराचा सर्वांत वेगाने प्रसार होत असल्याचे म्हटले आहे. कोरोनाची तिसरी लाट संपल्यानंतर आता चीन, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ब्रिटन यांसारख्या देशांमध्ये या नव्या उपप्रकाराचा उद्रेक होऊ लागला आहे.