रक्षाबंधन – भाऊ बहिणी मधील प्रेम वाढवणारा सण

26

रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. या दि‍वशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. राखी बांधण्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. रक्षाबंधन या सणाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम व्यक्त केले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्यातील देवाण-घेवाणही न्यून होत असतो. त्यामुळे हा सण भाऊ आणि बहीण या दोघांना ईश्वराकडे घेऊन जाणारा ठरतो.

चित्र सौजन्य – सनातन संस्था

रक्षाबंधनाच्या दि‍वशी हे करू नये

भावाला देवतांची चित्रे असलेल्या राख्या बांधू नका. राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा ! आजकाल रक्षाबंधन या सणाला राखीवर ‘ॐ’ किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्ततः पडल्यामुळे एकप्रकारे देवता आणि धर्मप्रतीक यांचे विडंबन होते. त्यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा.

रक्षाबंधन : इतिहास

पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.

‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली १२ वर्षे म्हणजे त्यांचे १२ दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.

भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून चालू झाली.

प्राचीन काळातील राखी.

प्राचीन काळातील राखी. (सौ – सनातन संस्था)

तांदूळ, सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्‍याने बांधली जाते.

बहीण आणि भाऊ यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब संपण्यास साहाय्य होणे

बहीण आणि भाऊ यांचा एकमेकांत साधारण ३० प्रतिशत देवाण-घेवाण हिशोब असतो. देवाण-घेवाण हिशोब राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून न्यून होतो, म्हणजे ते स्थुलातून एकमेकांच्या बंधनात अडकतात; पण सूक्ष्म-रूपाने एकमेकांत असणारा देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात.

भावनिक दृष्टीकोण : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम आणि क्रोध निष्प्रभ होणे

‘रक्षाबंधन हे विकारांमध्ये पडणार्‍या तरुण-तरुणींसाठी एक व्रत आहे. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पालटतो.

सदर लेख सनातन संस्था संकेतस्थळावरून साभार