News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नागपूर – कॉन्व्हेंट, शाळा, विद्यालय आणि महाविद्यालये येथे प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांचे मूळ दस्तावेज जमा करण्याची (collect and retain original documents) सक्ती करणे आणि नंतर शाळा, विद्यालय सोडतांना शुल्क किंवा अन्य कारणासाठी मूळ दस्तावेज रोखून ठेवता येणार नाहीत. असे करणारे संचालक आणि मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी ही माहिती माहिती अधिकारातून दिली आहे. समवेतच याविषयी सर्व विद्यार्थी आणि पालक यांना जागरूक रहाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सध्या राज्यात नर्सरी ते इयत्ता ९ वीत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धावपळ चालू आहे. नुकतेच इयत्ता १० वी आणि १२ वीचे निकाल घोषित झाले आहेत. यातच शाळा आणि विद्यालय येथे प्रवेश घेण्यासाठी लागणारे दस्तावेज संकलित करतांना विद्यार्थी आणि पालक यांची धावपळ होताना दिसून येत आहे. अशातच शुल्क बाकी असल्यामुळे आणि इतरत्र न जाता आपल्याच शाळा महाविद्यालयात प्रवेश घ्यावे म्हणून स्थानिक शाळा आणि विद्यालये जमा केलेले मूळ दस्तावेज देण्यास नकार देत आहेत, तसेच शाळेतून दस्तावेज गहाळ झाल्याचे सांगून वेळकाढूपणा करत आहेत, अशा काही विद्यार्थी आणि पालक यांच्या तक्रारी होत्या.

कायदेशीर कारवाईचे प्रावधान !

याविषयी शेखर कोलते यांनी संबंधित मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष भेटून आणि भ्रमणभाषवर संपर्क करून विचारपूस केली असता ‘शाळेत प्रवेश घेतांना मूळ दस्तावेज जमा करणे आणि राहिलेले पूर्ण शुल्क भरल्याशिवाय ते मूळ दस्तावेज न देणे हा आमचा नियम आहे’, असे त्यांनी सांगितले. यावर नियमांची प्रत मागितली असता देण्यास सरळ नकार देण्यात आला. ‘विद्यार्थ्याचे मूळ दस्तावेज रोखून ठेवण्याविषयी कायद्यात कोणतेही प्रावधान आणि शासनाचे कोणतेही आदेश नसतांनाही कागदपत्रे रोखल्यास कायदेशीर कारवाईचे प्रावधान असल्या’चे सांगताच विद्यार्थ्यांचे दस्तावेज परत करण्यात आले.