पणजी, २२ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’विषयी विद्यार्थी किंवा नवीन पिढी यांना माहिती होणे आवश्यक आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन गोमंतकियांना केले होते.
या विधानावरून तथाकथित विचारवंत, काँग्रेस पक्षातील काही नेते आदींनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. एका कार्यक्रमानंतर टिकेच्या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. सावंत उत्तर देत होते.
वास्तविक पोर्तुगिजांनी ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराविषयी पुरावे उपलब्ध असतांना मी पोर्तुगिजांच्या अत्याचाराविषयी विधान केल्यास माझ्यावर टीका केली जाते. पोर्तुगीज राजवटीत कोकणी भाषेचा वापर करण्यावर कशा प्रकारे निर्बंध लादले गेले आणि कोकणीवर कसा अन्याय झाला, याविषयी कोकणी भाषेतील तज्ञांनी सांगितलेले आहे. पोर्तुगिजांनी ३५० वर्षांपूर्वी मंदिरे नष्ट केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनीच पोर्तुगिजांना हे करण्यापासून रोखले. याविषयी माहिती नवीन पिढीला मिळाली पाहिजे.’’