मुंबई – जगभरातील कोट्यवधी हिंदू आतुरतेने वाट पहात असलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २२ मार्च या दिवशी जगभरात प्रदर्शित होणार होता; परंतु सेन्सॉर बोर्डाने हिंदी चित्रपटाला प्रदर्शित करणारे अनुमती पत्र ऐनवेळी म्हणजे २१ मार्चच्या दुपारी दीड वाजता दिले. हिंदी चित्रपटाला अनुमती मिळाल्यानंतरच मराठी चित्रपटाचा अर्ज सादर करता येतो. विश्वसनीय सूत्रांनी ‘सनातन प्रभात’ला याविषयी माहिती दिली. त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रात हा मराठी भाषेतील चित्रपट २२ मार्च या दिवशी प्रदर्शित होऊ शकणार नाही. याविषयी सर्वत्रच्या हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी सय्यद राबी हाशमी यांनी या चित्रपटावरून निर्मात्यांना प्रचंड प्रमाणात प्रश्न विचारून भांडावून सोडले. तसेच ऐनवेळीच हिंदी चित्रपटाला अनुमती दिली. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये या चित्रपटाला त्वरित अनुमती देण्यात आली, परंतु भारतातील सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रसारणार्थ पुष्कळ अडथळे निर्माण केले. एकूणच सेन्सॉर बोर्डाच्या आडमुठ्या किंबहुना हिंदुद्वेष्ट्या भूमिकेमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्रपटाला वेळेत प्रदर्शित होण्यासाठी एकप्रकारे अनुमतीच नाकारण्यात आली आहे, असे म्हणता येईल.
रणदीप हुडा यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. सावरकरांची भूमिका निभावण्यासाठी केवळ स्वत:चे वजन तब्बल ३० किलोच कमी केलेले नाही, तर स्वत:चे घर विकून पैसे उभे केले आहेत. तसेच एका वेळी निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते अशा चार भूमिका निभावल्या आहेत.