प्रजासत्ताकदिनाच्या निमंत्रणपत्रिका बनवण्यामध्ये आयुर्वेदाच्या वनस्पतींचा उपयोग !

23

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने पाहुण्यांना निमंत्रित करण्यासाठी यावर्षी केंद्र सरकारकडून पर्यावरणाला अनुकूल निमंत्रणपत्रिका बनवण्यात आल्या. या पत्रिकांसाठी वापरण्यात आलेल्या सर्व वस्तू पर्यावरणपूरक होत्या. या पत्रिका बनवण्यामध्ये अश्वगंधा, आवळा आणि कोरफड या आयुर्वेदाच्या औषधांच्या बिजांचा समावेशही करण्यात आला होता. या पत्रिकांचा वापर झाल्यानंतर त्यांचे भूमीमध्ये रोपण केल्यास त्यांतून आयुर्वेदाच्या झाडांची रोपे उगवतील.

प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येते. या वेळी पर्यावरणातील प्रदूषण न्यून करणे, कागदाची बचत करणे आणि औषधीय वनस्पतींना प्रोत्साहन मिळावे, यांसाठी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आयुष मंत्रालय अन् राष्ट्रीय औषधीय बोर्ड यांच्या सहकार्याने हा विशेष प्रयत्न करण्यात आला. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालिका तनुजा यांनी सांगितले की, या तीनही वनस्पती आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. त्यामुळे यांतून लोकांचे आरोग्य चांगले रहाण्यास साहाय्य होणार आहे.