News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती कमी होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात होणार्‍या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

दिवसभरात आवश्यक तेवढे पाणी अथवा तत्सम पेय प्यावे. पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. गडद रंगाची लघवी होत असल्यास ‘अधिक पाणी प्यायला हवे’, हे लक्षात घ्यावे. शीतकपाटातील पाणी पिणे टाळावे. सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी एक पेला पाणी पिऊन निघावे. बाहेर जातांना समवेत स्वतःची पाण्याची बाटली ठेवू शकतो.

पाणी एका वेळी गटागट भरपूर न पिता सावकाश प्यावे. उन्हातून आल्यावर लगेच पाणी न पिता ५ ते १० मिनिटे शांत बसून मग पाणी प्यावे. साखर असलेले पेय पिऊ शकतो; पण अधिक साखर असलेले पेय पचायला जड असल्याने शक्यतो ते पिऊ नये. शक्य असल्यास प्रतिदिनच्या आहारात ताक किंवा पन्हे यांचा समावेश असावा. बाहेरील खाद्य पदार्थ टाळावे.

सैलसर, फिकट रंगाची आणि वजनाला हलकी असणारी (शक्य असल्यास सुती) वस्त्रे वापरावीत. या दिवसांत जास्त घाम येत असल्याने थकवाही लवकर येतो. त्यामुळे व्यायामाचे प्रमाण अल्प ठेवावे. ऊन असतांना घरात किंवा सावली असलेल्या ठिकाणी थांबावे.

शक्यतो सकाळी १० पूर्वी आणि दुपारी ४ वाजल्यानंतर घरातून बाहेर पडावे. ‘उन्हाची झळ लागू नये’, यासाठी बाहेर जातांना डोळ्यांना ‘गॉगल’ लावावा. छत्री अथवा डोक्यावर सर्व बाजूंनी सावली येईल, अशा प्रकारची टोपी (‘हॅट’) वापरावी. टोपी उपलब्ध नसल्यास डोक्याला आणि कानाला मोठा पांढरा रूमाल बांधावा. जागरण केल्याने शरिरात पित्त आणि वात हे दोष वाढतात. त्यामुळे अती जागरण टाळावे.

उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.

उष्माघात म्हणजे काय ? (Heat stroke)

ऊष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असंही म्हंटल जाते. जास्तीच्या तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील उष्णतेचे संतूलन ठेवणारी संस्था नाकाम होते. वातावरणातील जास्त तापमान आपल्या शरीराला सहन होत नाही आणि ऊष्माघात होतो. अतिउष्णतेमुळं शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते.

अशावेळी योग्य उपचार वेळेवर मिळाले नाही तर त्या व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते.

उष्माघातापासून रक्षण होण्यासाठी उन्हात जाणे टाळा. उन्हाच्या कडाक्यामुळे शक्यतो घरीच थांबा. तरी सुद्धा बाहेर पडला तर डोक्यावर टोपी घाला. तसेच घरातून बाहेर पडताना आपल्या खिशात कांदा ठेवा, त्यामुळे उष्णतेचा आपल्याला त्रास होणार नाही. कांदा शरिरातील उष्णता खेचून घेत असल्याने ३ – ४ दिवसांनी तो कोरडा पडतो. कोरडा पडलेला कांदा टाकून देऊन नवीन कांदा समवेत ठेवावा.