अमळनेर (जिल्हा जळगाव) – येथील मंगळग्रह मंदिराबाहेर ‘भाविकांनी तोकडे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करू नये’, अशा आशयाचा फलक ६ मासांपूर्वी लावण्यात आला आहे. या फलकावर भाविकांसाठी ‘मंदिरात प्रवेश करतांना उत्तेजक कपडे, तोकडे कपडे परिधान करू नये, अंगप्रदर्शन करू नये, भारतीय संस्कृती जपावी’, असे लिहिण्यात आले आहे. परिसरातील भाविक प्रतिदिन मोठ्या संख्येने मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येतात.



महिला भाविकांकडून निर्णयाचे समर्थन !
मंदिरात लावण्यात आलेल्या फलकाविषयी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने महिलांशी संवाद साधला. तेव्हा ‘कपडे आणि देवावरील श्रद्धा यांचा थेट संबंध नाही; मात्र संस्कृती जपण्यासाठी घेतलेला हा निर्णय योग्यच आहे’, अशी प्रतिक्रिया एका तरुणीने दिली आहे, तर धनश्री नावाच्या युवतीने सांगितले की, भारतीय संस्कृती ज्या आधारावर टिकली आहे, तिचा एक भाग म्हणजे कपडे होय. मंदिरात अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्यास इतर भाविकांचे लक्ष वेधून घेतले जाते आणि वातावरण दूषित होते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी मंदिराचा हा निर्णय योग्य असून मंदिराचे नियम पाळायला हवेत.

मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी कपड्यांविषयी नियम पाळणे आवश्यक ! – दिगंबर महाले, अध्यक्ष, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर
राज्यात अशा प्रकारचा फलक प्रथम मंगळग्रह या मंदिरावर लावण्यात आला. प्रत्येक देशाची एक संस्कृती आहे, त्याचप्रमाणे भारताचीही संस्कृती आहे. कुणी कसेही कपडे घालावेत, त्याला विरोध नाही; मात्र मंदिरात तोकडे, उत्तेजक आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास आमचा विरोध आहे. आम्ही ‘फॅशन’च्या विरोधात नाही, तसेच कुणाच्याही व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातलेला नाही. शाळेत मुलांना ‘ड्रेस कोड’ असतो. त्यावर आपण काही बोलत नाही; कारण तो शाळेचा नियम आहे. त्याचप्रमाणे मंगळग्रह मंदिराच्या ठिकाणी पावित्र्य टिकून रहावे, तसेच भारतीय संस्कृती जपण्यासाठी हा नियम पाळणे आवश्यक आहे.

image by Wikipedia