मुंबई, दि. २६ : कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.



मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ७ व ८ जून २०२३ रोजी मुलाखतीस सकाळी 10 ते दुपारी 03 वाजेपर्यंत हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६१) कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.

संघ लोक सेवा आयोग (युपीएससी), नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी दिनांक ०३ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरिता (एम्प्लॉयमेंट न्यूज) रोजगार समाचार मध्ये जाहीरात प्रसिध्द झाली होती. संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ०६ जून २०२३ अशी होती. ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी www.upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.