आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य खरोखरच अचाट आणि अद्भुत होते; पण त्याहीपेक्षा मोठी होती, ती ‘हिंदवी स्वराज्याची संकल्पना !’ एवढ्या मोठ्या छप्पन बादशाहीचा धनी असणार्या औरंगजेबाला दाबून आपले सिंहासन निर्माण करणे म्हणजे अद्भुत कार्य होतेच; पण तेवढे केले असते, तरी ती वैयक्तिक परिघातील अद्भुत उपलब्धी ठरली असती. छत्रपती शिवाजी महाराज हे खरे वैदिक जीव आणि पूर्वजन्मीचे योगी होते; म्हणूनच केवळ राजकीय राज्यावर त्यांचे समाधान झाले नाही.
संस्कृतीची वाढ ही सर्वांगानेच व्हायला पाहिजे, ती केवळ राजकीय नको’, हे सूत्र त्यांच्या कार्यात पुरेपूर दिसते; म्हणून मिळालेल्या अगदी थोड्याच काळात त्यांनी भाषाशुद्धी हाती घेतली. ‘आज भाषाशुद्धीची चळवळ आपल्या पिढीने पाहिली, त्यापेक्षा शिवकाळात ती केवढी कठीण वाटत असेल’, याची आपण कल्पनाच करू शकतो. ‘राजव्यवहारकोश’ काढून त्यांनी भाषाशुद्धीची मुहूर्तमेढ रोवली.
राजकीय अधिकाराचे सिंहासन आणले. जुने मुसलमान समाजातील वजीर आणि बादशहा जाऊन छत्रपती अन् त्यांचे प्रधान मंडळ (अष्टप्रधान मंडळ) निर्माण केले. राज्याभिषेकाचा विधी विस्मृतीत गेला होता. तो गागाभट्टांसारख्या महापंडितांकरवी पुन्हा लिहून घेऊन प्रस्थापित केला. ही सर्व कार्ये पहाता ‘सांस्कृतिक महापुरुष म्हणजे केवळ ईश्वरी अवतार’, ही तत्कालीन सामान्य लोकांची समजूत किती खरी होती, हे दिसून येते. वैयक्तिक दृष्टीने शिवरायांनी कधीही धार्मिक असहिष्णुता अन् धर्मांधता दाखवली नाही; कारण त्यांनी खरी भारतीय परंपरा पूर्ण आत्मसात केली होती.
छत्रपती शिवरायांची ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ ही बिरुदावलीच भारतीय संस्कृतीचे अनन्य वैशिष्ट्य ठरते. आज जातीभेदाच्या भिंगातून या बिरुदावलीकडे पाहिले जाते, तशी ती मुळात नाही. प्रांतिक आणि भाषिक इतकेच काय, तर ‘देशाच्याही मर्यादा ओलांडून वैश्विक नातेच कायम जोडून ठेवायचे’, ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. हिंदु ज्या वेळी खरा हिंदु होतो, त्या वेळी तो हिंदुत्वातीत होतो. संत तुकाराम महाराजांप्रमाणे ‘आमुचा स्वदेश । त्रिभुवनी वास’ ! माझा देश विचारता ? त्रिभुवनच माझा देश आणि तीच माझ्या देशाची सीमा !
श्रीशिवरायांच्या ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ या बिरुदावलीसह त्यांची राजमुद्राही या दृष्टीने पहावी. ‘पूर्ण वैदिक संस्कृतीच्या शिकवणीचे सार त्यांच्या राजमुद्रेत उमटले आहे’, या म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही. ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रासारखी वर्धिष्णु – या उपमेकरता उपमान वापरले तेच वैश्विक ! जगात कुठेही दिसू शकणारे आणि वैश्विक अनुभवाचे ! ‘विश्ववंदिता’ म्हणजे माझी राजमुद्रा विश्ववंद्य राहील, केवढा हा आत्मविश्वास ! ‘देशवंद्य, महाराष्ट्र वंद्य नाही, तर विश्ववंद्य !’ श्री योगीराज ज्ञानराजांचे पसायदान ‘आता विश्वात्मके देवे’ असे आहे. देव कोणता धर्म किंवा देश यांच्या सीमेत बंदिस्त नाही. विश्वात्मक आणि राजयोगी शिवरायांची मुद्रा ‘विश्ववंदिता’ यांतील वैश्विक भावना हीच खरी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे.
धर्मरक्षणाकरता राज्य ! ‘राज्य हे साध्य नसून धर्मरक्षणाचे साधन आहे’, हीच शिकवण भारतीय परंपरेने पिढ्यान्पिढ्या संक्रमित केली. श्री शिवरायांची राजनीती आणि समर्थांचा दासबोध या दोन्हींच्या एकत्र चिंतनानेच शिवप्रभूंचे चरित्र खरे स्पष्ट होते. या शिवशाहीच्या मुळाशी भारतीय संस्कृतीचे बीज होते; म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धातील वेदीवर समर्थ रामदासस्वामींनी ‘धर्मासाठी मरावे । मरोनी अवघ्यासी मारावे । मारता मारता घ्यावे । राज्य आपुले ।।’ हा मंत्रोच्चार केल्यावर महाराष्ट्राचे लोकारण्य पेटून उठले, एवढेच नाही, तर दर्याखोर्यांसहित पूर्ण सह्याद्रीच पेटून उठला. त्या धडधडणार्या ज्वालांतून एकेक अग्नीशिखा आपल्या खांद्यावर घेऊन ती भगवी ध्वजा धारण करणारी सेना ‘हर हर महादेव’ हा मंत्र गर्जत गर्जत पुढे १०० ते १२५ वर्षे तरी हिंदुस्थान व्यापून राहिली ! ही शिवरायांची नीती त्यांच्या पुढील राजकीय वारसदारांनी चालवली.
मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांना इंग्रजांनी पत्र पाठवले आणि त्यांच्याविषयी (आंग्रे यांच्याविषयी) तक्रारी केल्या. त्याला उत्तर देतांना कान्होजी आंग्रे यांनी लिहिले, ‘आपण लिहिता, आपले राज्य शाश्वत राहील काय ? या जगात शाश्वत काहीच नाही. काळाचे नियम सर्वांना सारखे लागू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्यापुढे आहे.’ यावरून पुढील पिढीतील सरदारसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीलाच आदर्श समजत होते, हे दिसून येईल.
श्री शिवछत्रपतींच्या राजनीतीचे सूत्र ‘आक्रमण’ होते; कारण अन्यायाने माजलेल्या बंडाचा बीमोड करायचा म्हटले, तर आक्रमण आवश्यक ठरते; म्हणूनच श्री समर्थांनी ‘आहे तितुके जतन करावे । पुढे आणिक मेळवावे ।’ हे सूत्र सांगितले, कशाकरता ? तर ‘महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे !’ ‘महाराष्ट्र धर्म-महाराष्ट्र राज्य’ हे शब्द श्री समर्थांच्या वाङ्मयात येतात. त्यापूर्वीच्या संत एकनाथ महाराजांच्या आणि त्यापूर्वीच्या श्रीगुरुचरित्रातही ‘महाराष्ट्र धर्म’ शब्द आला आहे. हा वैदिक धर्म आणि भारतीय संस्कृती यांसाठी पर्यायी शब्द म्हणून आला आहे. यात प्रादेशिक अभिमान अभिप्रेत नाही. ही समाजमनाची मानसिक सिद्धता होती; म्हणूनच प्रौढ प्रताप थोरल्या बाजीरावांनी नर्मदा ओलांडून माळवा जिंकून पुढे देहलीवर चढून जातांना, ‘‘अरे ! बघता काय ? चला देहलीवर स्वारी करू ! हिंदुपदपातशाहीस आता कसला उशीर !!’’ हे काढलेले स्फूर्तीदायक उद्गारही श्री शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या बीजांचा स्वभाविक अंकुर होता.’
(साभार : मासिक ‘प्रज्ञालोक’, फेब्रुवारी २०१६)
संदर्भ – दैनिक सनातन प्रभात