मुंबई – महाराष्ट्र दिनापासून म्हणजे १ मेपासून ऑनलाईन मुद्रांक नोंदणी आणि ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रम राबवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३ एप्रिल या दिवशी केली. या उपक्रमामुळे पुणे येथे बसून नागपूर येथील घराची किंवा मुंबईत बसून पुणे येथील घराची नोंदणी करता येईल. ही सर्व प्रक्रिया ‘फेसलेस’ (चेहराविरहीत) असेल, असेही त्यांनी सांगितले. या प्रक्रियेमुळे घर खरेदीतील दलालीला चाप बसू शकतो.
घर खरेदी-विक्री करतांना नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावे लागते. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करतांना दलालांचाही अडथळा असतो. त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक आणि गतीमान सरकारला १०० दिवसांचा कार्यक्रम दिला होता. या अंतर्गत महसूल विभागाचे मुद्रांक निरीक्षक आणि महानिरीक्षक यांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. त्यानुसार आपले सरकार ‘एक राज्य एक नोंदणी’ पद्धत चालू करत आहे.
आधारकार्ड आणि प्राप्तीकर कागदपत्रांच्या साहाय्याने नागरिकांना ही नोंदणी करता येईल. ऑनलाईन मुद्रांक नोंदणीची प्रक्रिया आपण १ मेपासून चालू करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डिजीटल इंडिया, डिजीटल महाराष्ट्र’चा संकल्प केला आहे. आमचे सरकार त्यावर काम करत आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सरकारने प्रायोगिक पातळीवर ही प्रक्रिया मुंबई आणि उपनगरांत राबवली होती. तिचा आता राज्यभरात विस्तार केला जाणार आहे.