परतीच्या पावसाचे संकट टळलेले नसल्याने घाईगडबडीत निर्णय घेणार नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

87

सोलापूर – हानीग्रस्त शेतकरी आणि घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, शेतकर्‍यांना हानीभरपाई देण्यासाठी राज्यशासन ठोस उपाययोजना करील. परतीच्या पावसाचे संकट अजूनही टळलेले नाही. येत्या काही दिवसांत अतीवृष्टीची चेतावणी देण्यात आली आहे. त्यामुळे घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी येथील हानीग्रस्त भागाची पहाणी केली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. पुढील २ दिवस मुख्यमंत्री हानीग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. या वेळी विविध मंत्री आणि स्थानिक खासदार उपस्थित होते.

हवामान खात्याने २२ आणि २३ ऑक्टोबरपर्यंत अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. अतीवृष्टीमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या १० कुटुंबियांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहाणीच्या वेळी केले.