नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणासुदीच्या दिवसांत देशवासियांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलंय. ‘लॉकडाऊन गेला असला तरी करोना व्हायरस मात्र अद्याप गेलेला नाही’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी देशवासियांना साद घातलीय. करोनाविरुद्धच्या लढाईत जनता कर्फ्युपासून आज भारतवासियांनी मोठा प्रवास केल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलंय.
बहुतेक लोक आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि पुन्हा आयुष्याची सुरुवात करण्यासाठी दररोज घराबाहेर पडत आहेत. लॉकडाऊन संपला तरी कोरोना व्हायरस संपलेला नाही, हे आपण विसरू नये. प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे आज परिस्थिती सुधारली आहे, ती पुन्हा बिघडणार नाही याची प्रत्येकांना काळजी घेणे गरजेचं आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना अनेकजण कोरोनाचे नियम पाळता दिसत नाहीत. लोकांना खबरदारी घेणे बंद केलं हे चुकीचे आहे. तुम्ही मास्क लावत नसाल, हात वेळेच धुवत नसाल तर तुम्ही कुटुंबातील लहान मुले, वयस्कर व्यक्ती यांना संकटात टाकत आहात, असं मोदींनी सांगितलं. कोरोनाची लस येईपर्यंत आपण कोरोनाशी असलेला आपला लढा कमकुवत होऊ देऊ नये. कोरोना लस येईल तेव्हा, ती प्रत्येक भारतीयापर्यंत किती लवकर पोहोचेल याची सरकारकडून तयारीही सुरू आहे. ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी काम वेगाने सुरू आहे, असंही मोदींनी सांगितलं.