हिंदु धर्मातील प्रत्येक कृती ही अध्यात्मशास्त्रावर आधारलेली आहे. ती करण्याकडेच जिवाचा कल असला, तरच त्याला खर्या दृष्टीने लाभ होण्यास साहाय्य होते. कोणताही समारंभ किंवा कार्य सिद्धीस जाण्यासाठी देवतेचा आशीर्वाद मिळणे आवश्यक असते. उद्घाटन केल्यामुळे देवतांच्या लहरींचे कार्यस्थळी आगमन होते आणि त्यामुळे कार्यस्थळी संरक्षक-कवच निर्माण होऊन तेथील त्रासदायक स्पंदनांच्या संचारावर बंधन येते. यासाठी उद्घाटन (Inauguration) हे विधीवत, म्हणजेच अध्यात्मशास्त्रीय आधार असलेल्या विधींचे पालन करूनच केले पाहिजे.
‘उद्’ म्हणजे प्रकट करणे. देवतेच्या लहरींना प्रकट किंवा आवाहन करून घटात (कार्यस्थळी) स्थानापन्न होण्यासाठी प्रार्थना करून कार्यारंभ करणे, म्हणजे उद्घाटन करणे. नारळ वाढवणे आणि दीपप्रज्वलन करणे, हे विधी वास्तूशुद्धीतील , म्हणजेच उद्घाटनातील महत्त्वाचे विधी आहेत. ‘नारळ वाढवणे, म्हणजे वाईट शक्तींच्या संचाराला बंधन घालणे आणि दीपप्रज्वलन करणे, म्हणजे ज्ञानपिठावरील (व्यासपिठावरील) कार्यरत दैवी लहरींचे स्वागत करून त्यांना प्रसन्न करून घेणे.
नारळ वाढवण्यामागील शास्र – व्यासपिठाची स्थापना करण्यापूर्वी (तसेच वास्तूउभारणी करण्यापूर्वी) भूमीपूजन करतांना नारळ वाढवला जातो. ज्या भूभागावर व्यासपिठाची उभारणी करावयाची असते, त्या भूभागाचे शुद्धीकरण नारळ वाढवून केले जाते आणि तेथील त्रासदायक स्पंदनांचे निराकरण केले जाते. जेथे व्यासपीठ आधीच बांधलेले असते, तेथे व्यासपिठाच्या समोर भूमीवर दगड ठेवून तेथील स्थानदेवतेला प्रार्थना करून नारळ वाढवावा. प्रार्थना करून स्थानदेवतेला आवाहन केल्यामुळे तिच्या कृपेमुळे नारळातील पाण्यातून सर्व दिशांना स्थानदेवतेकडून प्रक्षेपित होणार्या लहरी पसरतात. त्यामुळे कार्यस्थळी येणार्या त्रासदायक स्पंदनांच्या वेगाला बंधन घालणे शक्य होते आणि त्या परिसराच्या भोवती स्थानदेवतेच्या सूक्ष्म-लहरींचे मंडल बनल्याने समारंभाची सांगता निर्विघ्नपणे होते.’

चर्चासत्रे, साहित्य संमेलने, संगीत महोत्सव इत्यादींचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करतात. व्यासपिठाच्या स्थापनेच्या पूर्वी नारळ वाढवावा आणि प्रत्यक्ष उद्घाटनाच्या समयी दीपप्रज्वलन करावे. नारळ वाढवण्यामागे कार्यस्थळाची शुद्धी व्हावी, हा मुख्य उद्देश आहे. व्यासपीठ हे ज्ञानदानाच्या कार्याशी संबंधित, म्हणजेच ज्ञानपीठ असल्याने तेथे दीपाला महत्त्व आहे. विक्रीकेंद्रे, आस्थापने इत्यादी घटक हे अधिकतर व्यावहारिक कर्मांशी संबंधित असल्याने त्यांचे उद्घाटन करतांना दीपप्रज्वलन करण्याची आवश्यकता नसते; केवळ नारळ वाढवावा. संतांच्या केवळ अस्तित्वामुळे ब्रह्मांडातील आवश्यक त्या देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यस्थळी आकृष्ट होऊन कार्यरत होण्यास साहाय्य होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय आणि शुद्ध बनून कार्यस्थळाच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते; म्हणून संतांनी उद्घाटन केल्यास नारळ वाढवण्याचीही आवश्यकता नसते.
पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे फीत कापून उद्घाटन का करू नये ? – ‘कोणतीही गोष्ट कापणे, हे विध्वंसक वृत्तीचे द्योतक आहे. फीत कापणे, म्हणजेच फितीतील अखंडतेचा भंग करणे किंवा लय करणे. ज्या गोष्टीतून लय साधतो, अशी कृती तामसिकतेचे लक्षण आहे. फीत कापण्याच्या तामसिक कृतीच्या माध्यमातून उद्घाटन केल्याने वास्तूतील त्रासदायक स्पंदनांवर कोणताच परिणाम होत नाही. सर्वसाधारण व्यक्ती ही राजसिक आणि तामसिक असते. फीत कापून उद्घाटन करतांना तिच्यातील अहं जागृत होतो. तिच्या देहातून प्रक्षेपित होणार्या रज-तमात्मक लहरींमुळे तिच्याभोवती असलेले वायूमंडल, तसेच तिच्या हातातील कात्रीही रज-तम कणांनी भारित बनते. अशा कात्रीच्या स्पर्शाने फितीभोवती असलेल्या वायूमंडलातील रज-तम कणांना गती प्राप्त होते आणि कात्रीने फीत कापल्यामुळे तुटलेल्या फितीतून कारंजासारख्या रज-तमात्मक गतीमान लहरींचे संपूर्ण वातावरणात प्रक्षेपण होते. ज्या कृतीतून त्रासदायक लहरींची निर्मिती होते, अशी कृती हिंदु धर्माला त्याज्य आहे; म्हणून पाश्चात्त्य प्रथेप्रमाणे फीत कापून उद्घाटन करू नये.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र’