भारत आणि चीन पुन्हा एकदा संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले. ते ‘एशिया सोसायटी’च्या संवादात्मक सत्रात बोलत होते. ‘भविष्यातही भारत आणि चीन यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु ते संघर्षात न पडता इतर मार्गांनी सोडवता येतील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

डॉ. जयशंकर यांनी मांडलेली सूत्रे

१. तणावपूर्ण नातेसंबंध कुणासाठीही लाभदायक नसतात. वर्ष २०२० मध्ये गलवान खोर्‍यात जे घडले तो समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हता.

२.  गलवानमध्ये जे घडले ते खरोखरच वेदनादायक होते. तो केवळ संघर्ष नव्हता, तर लेखी करारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. असे नाही की, हे सूत्र पूर्णपणे संपले आहे, आम्ही अजूनही घटनेशी संबंधित काही भाग हाताळत आहोत.

३. आपण अनेक सूत्रांवर स्पर्धा करतो; परंतु आपण यासाठी लढू नये. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध कोणत्याही पक्षाच्या हिताचे नाहीत; कारण जर सीमेजवळ शांतता भंग झाली, तर उर्वरित संबंधही योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत.

४. ऑक्टोबर २०२४ पासून संबंधांमध्ये काही सुधारणा झाल्याचे आम्हाला वाटते. आम्ही त्यावर काम करत आहोत. मी चिनी परराष्ट्रमंत्र्यांना अनेक वेळा भेटलो आहे आणि माझे सहकारीही भेटले आहेत. वर्ष २०२० मध्ये झालेल्या हानीभरपाई आपण करू शकतो का ? हे पहाण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने प्रयत्न करत आहोत.